Spread the love

 

अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई करण्याचे दिले निर्देश

स्वच्छ सर्वेक्षण २०२६ च्या अनुषंगाने आरोग्य विभागाची सविस्तर आढावा बैठक

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व नालेसफाईची कामे वेळेत, नियोजनबद्ध आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले तसेच सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेचा आरोग्य विभागाने सातत्याने आढावा घ्यावा. सार्वजनिक स्वच्छतेच्या कामामध्ये कोणताही हलगर्जीपणा करू नये. नाल्यांवरील तसेच शहरातील अनधिकृत बांधकामे, अडथळे निर्माण करणारी आस्थापने यांच्यावर कडक कारवाई करावी,असे देखील त्यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये दिवंगत महापौर मधूकरराव पवळे सभागृहात नुकतीच आरोग्य विभागाची आढावा बैठक आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंबासे, सह शहर अभियंता बापू गायकवाड, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सह अभियंता बापू गायकवाड, अनिल भालसाखळे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, सचिन पवार, अण्णा बोदडे, पंकज पाटील, व्यंकटेश दुर्वास, सीताराम बहुरे, नगर सचिव मुकेश कोळप, सहायक आयुक्त तानाजी नरळे, अमित पंडित, किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, राजाराम सलगर, निवेदिता घार्गे, पूजा दूधनाळे, अतुल पाटील, राजाराम सलगर, किशोर ननवरे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांच्यासह महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

स्वच्छ सर्वेक्षण २०२६ च्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध कामांचा आणि उपक्रमांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले, पावसाळ्यात पाणी साचणे, नाले तुंबणे किंवा पूरस्थिती निर्माण होणे टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी अधिक सजग आणि सक्षम राहणे आवश्यक आहे. नालेसफाईची कामे केवळ पूर्ण करणे नव्हे, तर ती गुणवत्तापूर्ण पद्धतीने आणि वेळेत पूर्ण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांना दिलासा देणे हे प्राथमिक उद्दिष्ट असावे, असेही त्यांनी अधोरेखित केले.

नाल्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत बांधकामांमुळे शहरात पाणी साचण्याची समस्या गंभीर बनते. त्यामुळे अशा बांधकामांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असे स्पष्ट करत आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी संबंधित विभागांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर अनधिकृत नळजोड, ओव्हरहेड वायर, पदपथावरील अतिक्रमण, शहर विद्रूप करणारे होर्डिंग, बॅनर व जाहिराती यांच्यावरही कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले.

बैठकीत पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन, तसेच उन्हाळ्यात नागरिकांना आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधांची उपलब्धता यांचा सुद्धा सखोल आढावा घेण्यात आला. विविध विभागांमध्ये समन्वय साधून संभाव्य संकटांना सामोरे जाण्यासाठी पूर्वतयारी करण्याचे निर्देश देण्यात आले.

आरोग्य विभागाने सादर केलेल्या माहितीनुसार, शहरातील एकूण १४५ नाले आणि सुमारे ९४ हजार ९१३ मीटर लांबीच्या नाल्यांची साफसफाई सुरू आहे. यापैकी आतापर्यंत ४७.३४ टक्के काम पूर्ण झाले असून मार्च महिन्याच्या तुलनेत प्रगतीत लक्षणीय वाढ झालेली आहे.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय आढावा घेतल्यास ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाने ६४.३८ टक्के प्रगती साधत आघाडी घेतली आहे. त्याखालोखाल ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाने ६३.०० टक्के, ‘फ’ ने ५४.७२ टक्के आणि ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाने ५१.५० टक्के प्रगती साधली आहे. ‘ग’ (४४.११%), ‘ड’ (३९.५५%), ‘ह’ (३२.७२%) आणि ‘क’ (२८.७५%) क्षेत्रीय कार्यालयांमध्येही कामाला गती देण्यात येत असून उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.

यावेळी स्वच्छ सर्वेक्षण २०२६ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचाही आढावा घेण्यात आला. झिरो वेस्ट स्लम, झिरो वेस्ट स्कूल, आर.आर.आर. सेंटर या उपक्रमांद्वारे शहर अधिक स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

आनंदनगर येथील ‘शून्य कचरा’ प्रकल्पाचे विशेष कौतुक करत, अशा उपक्रमांचा विस्तार शहरातील इतर भागांमध्येही करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. नागरिकांचा सहभाग वाढवून स्वच्छतेच्या उपक्रमांना अधिक बळ देण्यावरही त्यांनी भर दिला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version