Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत बोगस उपसूचनांच्या आधारे सुमारे ५२ कोटी रुपयांची देयके नियमबाह्य पद्धतीने अदा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

महापालिकेच्या स्थापत्य, पाणीपुरवठा व बीआरटी विभागाशी संबंधित सुमारे ७० कामांची बिले कोणतीही अधिकृत मंजुरी न घेता ठेकेदारांना देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. स्थायी समिती अथवा सर्वसाधारण सभेची मान्यता नसताना ‘उपसूचना’ दाखवून ही देयके अदा करण्यात आल्याचा आरोप आहे.
याबाबत भोईर यांनी दिलेल्या निवेदनात नगरसेवकांची दिशाभूल करून स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या तसेच विभाग प्रमुखांना माहिती न देता प्रक्रिया राबविण्यात आल्याचा उल्लेख केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविणकुमार जैन यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला असून, चौकशी निष्पक्ष होण्यासाठी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच, प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदारांची देयके स्थगित करावीत आणि इतिवृत्तात फेरफार झाल्याचा संशय असल्याने त्याचीही तपासणी करावी, असे निवेदनात नमूद आहे.
या संदर्भात महापालिका प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version