पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पावसाळ्यापूर्वी हिंजवडी – माण भूगाव – पिरंगुट परिसरातील पाहणी दौरा करण्याची मागणी भोर मुळशी राजगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांच्याकडे केली.
आमदार शंकर मांडेकर यांनी आज मतदारसंघातील विविध रस्ते कामे व प्रलंबित प्रश्नांबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांची तसेच मुख्य अभियंता रिनाज पठाण, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री. शिवप्रसाद बागडी तसेच नगररचना अधिकारी अस्मिता कलकुटकी, वन अधिकारी सचिन पाटील यांच्या उपस्थितीत भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी पावसाळ्यापूर्वी आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी हिंजवडी – माण – भुगाव – पिरंगुट परिसराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीत खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले :
पावसाळ्यापूर्वी हिंजवडी – माण परिसराचा पाहणी दौरा करणे, घोटावडे फाटा येथे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भुयारी मार्ग करणे, भुगाव बायपास रस्ता पाहणी व भूसंपादन बाबत कार्यवाही करणे, सारोळे – वीर रस्ता सुधारणा करणे, मारुंजी रस्त्यावरील विद्युत पोल काढण्यासाठी निधीची तरतूद करणे, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना संदर्भातील प्रश्नांवर चर्चा,नांदे ता. मुळशी येथील चौक सुधारण्यासाठी निधीची तरतूद करणे,नदी सुधार प्रकल्प (STP) लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी चर्चा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचना आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांनी केल्याचे आमदार शंकर मांडेकर यांनी सांगितले.
