Spread the love

 

‘शिक्षणाच्या वाटेवर’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘जीवनाचा सकारात्मकतेने विचार केल्याने लेखनात कटूता दिसत नाही, तरीसुद्धा जीवनातील बऱ्या वाईट बाबी साहित्यात आल्या पाहिजेत तरच जीवनातील कठीण प्रसंगी आपण कसा प्रतिसाद दिला हे कळते. जीवन संघर्षावरील उपायच पुढील पिढीसाठी मार्गदर्शक असतो.’ असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक व शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. राजा दीक्षित यांनी शाहीर योगेश रंगमंच, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे रविवार, दिनांक ०५ एप्रिल २०२६ रोजी काढले. उत्कर्ष प्रकाशन निर्मित आणि श्रीकांत चौगुले लिखित ‘शिक्षणाच्या वाटेवर’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना प्रा. डॉ. राजा दीक्षित बोलत होते. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिक डाॅ. न. म. जोशी अध्यक्षस्थानी होते; तर ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे, प्रकाशक सु. वा. जोशी आणि लेखक श्रीकांत चौगुले यांची व्यासपीठावर तसेच पिंपरी – चिंचवड आणि पुणे परिसरातील अनेक दिग्गज साहित्यिकांची सभागृहात उपस्थिती होती. गिरीश प्रभुणे म्हणाले की, ‘कोणत्याही स्पर्धेपासून अथवा अहमहमिकेपासून दूर राहूनही पिंपरी – चिंचवडच्या सांस्कृतिक विश्वात चौगुले यांचा सातत्यपूर्ण सहभाग असतो.’

शालेय विद्यार्थिनीने दप्तरातून आणलेल्या ‘शिक्षणाच्या वाटेवर’ या पुस्तकाच्या प्रतींचे मान्यवरांच्या हस्ते अभिनव पद्धतीने प्रकाशन करण्यात आले. सु. वा. जोशी यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत चौगुले यांनी आपल्या मनोगतातून, ‘निवृत्तीच्या टप्प्यावर मागे वळून बघतानाचे सिंहावलोकन ‘शिक्षणाच्या वाटेवर’ या आत्मकथनपर पुस्तकात शब्दबद्ध केले आहे!’ अशी भावना व्यक्त केली. याप्रसंगी एम. पी. चौगुले आणि राजन लाखे यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. डॉ. न. म. जोशी यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘विद्यार्थ्यांना शिकवत असताना स्वतःही शिकत जाणे हे चौगुले यांच्या व्यक्तिमत्त्वातील ठळक वैशिष्ट्य आहे. शिक्षक हा निरंतर विद्यार्थी असला पाहिजे. ती भूमिका चौगुले चोख वटवत आहेत. कोणत्याही गोष्टीचा ते सखोल अभ्यास करतात आणि मगच व्यक्त होतात.’ असे मत मांडले. चौगुले परिवाराने संयोजन केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. शिरीष पडवळ यांनी आभार मानले.

साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी
ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार, राजन लाखे, पुरुषोत्तम सदाफुले,डॉ दिलीप गरुड, दिलीप फलटणकर, बशीर मुजावर, बी आर माडगूळकर, अरुण बोराडे, शंकर घोरपडे, प्रज्ञा देशपांडे, शोभा जोशी, प्रफुल्ल बिष्षुरकर, लिना आढाव,बाबुराव हंद्राळे, शारदा मुंडे, दिनेश भोसले, डॉ सीमा काळभोर, जगन्नाथ नेरकर आत्माराम हारे, हेमंत जोशी, संदीप तापकीर, चित्रकार विजय दीक्षित, अभिनेते संदीप साकोरे, प्रकाशक नितीन हिरवे, राम गायकवाड, प्रकाश निर्मळ, निलेश शेंबेकर , अनघा दिवाकर, गायक रवी कांबळे आदी मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version