Spread the love

महानगरपालिका आयुक्तांनी शहराचा अपमान करणारी बेजबाबदार विधाने टाळावीत – आमदार अमित गोरखे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘पिंपरी चिंचवडला जगात कोण ओळखतं?’ असे केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी, गैरजबाबदार आणि शहराच्या अस्मितेला धक्का देणारे आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केली आहे.

देशाच्या नकाशावर ठळकपणे उमटलेले महत्त्वाचे केंद्र
पिंपरी चिंचवड हे केवळ एक शहर नसून, औद्योगिक, सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या देशाच्या नकाशावर ठळकपणे उमटलेले एक महत्त्वाचे केंद्र आहे. पिंपरी चिंचवड हे शहर जागतिक स्तरावर औद्योगिक प्रगतीसाठी ओळखले जाते. टाटा मोटर्स, मर्सिडीज बेंझ, फोक्सवॅगन, बजाज ऑटो यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या उद्योगसंस्था येथे कार्यरत असून, देशाच्या आर्थिक विकासात मोठे योगदान देत आहेत. इतकेच नव्हे तर, पिंपरी चिंचवड हे संतांची परंपरा आणि सामाजिक चळवळींचे केंद्र राहिले आहे. संत तुकाराम महाराजांची पावन भूमी देहू आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी ही तीर्थक्षेत्रे याच परिसरात आहेत, ज्यामुळे देश-विदेशातून लाखो भाविक येथे येतात. त्यामुळे या शहराची ओळख केवळ औद्योगिक नाही, तर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक स्तरावरही जागतिक आहे, असे प्रतिपादन देखील आमदार अमित गोरखे यांनी केले आहे.

स्मार्ट सिटी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही देशातील सर्वात सक्षम आणि सक्षम प्रशासन देणाऱ्या महानगरपालिकांपैकी एक मानली जाते. स्मार्ट सिटी, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील कामगिरीमुळे या शहराने राष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा परिस्थितीत आयुक्तांनी केलेले वक्तव्य हे शहराच्या प्रगतीकडे आणि नागरिकांच्या कष्टांकडे दुर्लक्ष करणारे आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहराचा इतिहास, सामाजिक-आर्थिक योगदान आणि नागरिकांची भावना समजून घेणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयांमुळे पिंपरी चिंचवड शहराला आयटी क्षेत्रात वेगळी ओळख मिळाली असून ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेनेही मोठी झेप घेता आली आहे. याच भक्कम पायावर आज हे शहर राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप निर्माण करत आहे.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पिंपरी-चिंचवडच्या गौरवशाली इतिहासाचा आणि औद्योगिक प्रगतीचा गांभीर्याने अभ्यास करावा, त्यानंतरच जबाबदारीने विधाने करावीत. शहराची जागतिक ओळख ही कष्टाने निर्माण झाली असून, अशा प्रकारची अनाठायी वक्तव्ये करणे अत्यंत दुर्दैवी आहे. पिंपरी चिंचवड हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे अभिमानाचे शहर आहे. त्याची ओळख जगभर आहे, आणि ती अधिक भक्कम करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे, असेही आमदार अमित गोरखे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version