Spread the love

हिंदूंनी जाती-पाती, पंथभेद विसरून एकत्र यावे,अजय बुवा रामदासी महाराज या

“तुम्ही-आम्ही सकळ हिंदू, बंधू-बंधू” या विचारानेच जाती-पातीच्या भिंती पाडल्या जातील- मिलिंद महादेव कांबळे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)–हिंदूंना त्यांच्या धर्माचे शिक्षण हेतुपुरस्सर दिले गेले नाही, त्यामुळे स्वधर्माबद्दलचा अभिमान कमी झाला आणि समाज विखुरला असून त्यामुळे हिंदूंनी जाती-पाती, पंथभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन सज्जनगडाचे महंत अजय बुवा रामदासी महाराज यांनी हिंदू समाजाला केले.पूर्णानगर आणि शिवतेजनगरच्या पावन भूमीत प्रथमच सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य ‘विराट हिंदू संमेलनाचे’ आयोजन पंडित दीनदाळ उपाध्याय क्रीडा संकुलन,शनी मंदिर मैदान येथे (दि.२९) करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

या विराट हिंदू संमेलनाला हजारो हिंदू बांधव व भगिनी उपस्थित होत्या. सर्वांनी यावेळी भोजनाचा आस्वाद घेतला.

सुरुवातीला प्रभुश्रीमाच्या भव्य मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली.शाळकरी मुलांनी पारंपारिक युद्धकला, तलवारबाजी, दांडपट्टा, वासुदेव, पिंगळा आणि मर्दानी खेळाची प्रत्याक्षिके यावेळी सादर केली. प्रमुख पाहुण्यांचे यावेळी जंगी स्वागत करण्यात आले.फटाक्याच्या आवाजाने परिसर दणाणून गेला होता. हिंदू एकत्रितेच्या शपथेने वातावरण फुलून गेले होते.

यावेळी अजय बुवा रामदासी महाराज म्हणाले की,आपण राजकीयदृष्ट्या स्वतंत्र असलो तरी सांस्कृतिक, धार्मिक आणि भाषिक स्वातंत्र्य अजूनही अबाधित नाही. हिंदूंना त्यांच्या धर्माचे शिक्षण हेतुपुरस्सर दिले गेले नाही, त्यामुळे स्वधर्माबद्दलचा अभिमान कमी झाला आणि समाज विखुरला.वाईट गोष्टींना नाकारून चांगल्याचा स्वीकार करणारा तोच हिंदू. ‘हिंदू’ आणि ‘हिंदुस्तान’ या शब्दांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व आहे.हिमालयापासून हिंद महासागरापर्यंतचा प्रदेश म्हणजे हिंदुस्थान, हे अनेकांना माहीत नसल्याचा खेद वाटतो.“संघ शक्ती कलौ युगे” या उक्तीचा संदर्भ घेऊन हिंदूंनी जाती-पाती, पंथभेद विसरून एकत्र यावे. शत्रू तुमची जात विचारत नाही, तो फक्त तुम्ही हिंदू आहात हेच पाहतो.केवळ घोषणा देऊन काही साध्य होत नाही, तर कृती आवश्यक असून रामाच्या आदर्शांचे अनुकरण केले पाहिजे.

पालकांनी आपल्या मुलांना धर्म, संस्कृती आणि इतिहास शिकवणे अत्यंत आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी.“धर्मो रक्षति रक्षितः” म्हणजे धर्माचे रक्षण करणाऱ्याचेच रक्षण होते. समाजात वाढत असलेल्या अन्यायाविरोधात संघटितपणे उभे राहण्याची गरज असून आहे.उपासनेची चार अंगांनी (देह, वाणी, मन, बुद्धी) साधना करावी.मंदिर, आश्रम किंवा गोशाळेत सेवा करून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची गरज “प्रथम आपण हिंदू आहोत, त्यानंतर इतर कोणतीही ओळख आहे.” समाजात विघटन करणाऱ्या प्रवृत्तींना ओळखून त्यापासून सावध राहण्याचे मत अजय बुवा रामदासी महाराज यांनी व्यक्त केले.

अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी विचार व्यक्त करतांना सांगितले की,“आपण हिंदू आहोत, पण खरंच हिंदू म्हणून जगतोय का?” हिंदू धर्म ही केवळ श्रद्धा नसून जीवनपद्धती आहे. आपल्या पूर्वजांचा महान वारसा आपण विसरत चाललो आहोत.विखुरलेला समाज कधीच मजबूत होत नाही. जाती-पाती, पंथभेद विसरून एकत्र येणे ही काळाची गरज आहे. मुलांना धर्म, संस्कृती आणि इतिहास यांचे शिक्षण देणे अत्यावश्यक आहे. ज्ञानेश्वरी, दासबोध, संतांच्या विचारांचे महत्त्व असून कुटुंबसंस्थेची मजबुती हीच धर्मरक्षणाची पहिली पायरी आहे.हिंदू धर्माने स्त्रीला पुरुषाच्या जीवनात समान स्थान दिले आहे. कोणतेही मंगल कार्य पत्नीशिवाय पूर्ण होत नाही, ही परंपरा स्त्रीच्या सन्मानाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.

पारंपरिक वेशभूषा, पूजा-पद्धती आणि हिंदूंची लक्षणे आचरणात आणली पाहिजे. हिंदू धर्मात कपाळावर गंध, गळ्यात माळ, पारंपरिक पोशाख यांचे महत्त्व आहे.तरुणांचे आयुष्य चंदनासारखं असावं, जे स्वतः झिजतं पण इतरांना सुवास देते.पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे कुटुंबसंस्था ढासळत असून आई-वडिलांचा सन्मान, ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव’ या संस्कारांचे पालन तरुणांनी करावे.वृद्धाश्रमाची वाढती संख्या ही समाजासाठी चिंतेची बाब आहे.घरामध्ये नियमित पूजा, ‘रामरक्षा’, ‘हनुमान चालीसा’, शुभंकरोती यांसारख्या प्रार्थनांचा समावेश करावा.सण-उत्सवांचा खरा अध्यात्मिक अर्थ समजून घेतला पाहिजे.कलियुगात संघटित शक्तीच सर्वात मोठे सामर्थ्य आहे. “आपण एक झालो तर कोणतीही शक्ती आपल्याला हरवू शकणार नाही,” असा विश्वास भगरे गुरुजी यांनी व्यक्त केला.

सामाजिक पंच परिवर्तन यावर बोलताना मिलिंद महादेव कांबळे म्हणाले की, समाज शिक्षण घेतोय, पण संघटित होण्यामध्ये कमी पडतोय.आपण आपल्याच समाजातील लोकांशी स्पर्धा करतोय, हे चित्र बदलण्याची गरज आहे.समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय सन्मान मिळत नाही.तरुणांनी सरकारी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय आणि उद्योजकतेकडे वळावे.जेव्हा आपण दुसऱ्यांना रोजगार देऊ, तेव्हाच समाजाचा खरा विकास होईल.भारतीय संस्कृती, तत्वज्ञान आणि ज्ञानपरंपरा महत्त्वाची मानली जात असून गेल्या काही वर्षांत भारताची जागतिक प्रतिमा उंचावली आहे.नालंदा विद्यापीठासारख्या ऐतिहासिक ज्ञानकेंद्रांमुळे भारत पूर्वीपासूनच ज्ञानाचा केंद्रबिंदू राहिला आहे.ब्रिटिश काळात सुरू झालेल्या मॅकॉले शिक्षणपद्धतीमुळे भारतीय माणूस मनाने परकीय झाला असून भारतीय ज्ञानपरंपरेचा अभ्यास आणि संशोधन पुन्हा वाढवणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या “तुम्ही-आम्ही सकळ हिंदू, बंधू-बंधू” या विचारानेच जाती-पातीच्या भिंती पाडल्या जातील.एक पाणवठा, एक मंदिर, एक स्मशानभूमी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची गरज आहे. मोबाईल आणि डिजिटल व्यसनामुळे नात्यांमध्ये दुरावा वाढत असून त्याचा परिणाम कुटुंबव्यवस्थेवर होत आहे.किमान आठवड्यातून एकदा तरी कुटुंबाने एकत्र बसून भोजन आणि संवाद साधावा.रस्ते नियम पाळणे, स्वच्छता राखणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून हक्कांबरोबरच कर्तव्यांची जाणीव असलेला नागरिक घडवणं आवश्यक आहे.निसर्गाचा समतोल बिघडत चालला असून पर्यावरण रक्षणाला प्राधान्य देणे काळाची गरज आहे.आपल्या पूर्वजांनी निसर्गाला देव मानलं, आपणही त्या परंपरेचा सन्मान केला पाहिजे.स्वबोध (संस्कृती आणि ओळख),सामाजिक समरसता,कुटुंब प्रबोधन,नागरी कर्तव्य,पर्यावरण संरक्षण या पाच घटकांवर काम केल्यासच समर्थ समाज आणि सक्षम राष्ट्र उभे राहील, असा विश्वास मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक महेंद्र पाटील,सूत्रसंचालन राजाराम सावंत यांनी तर आभार राजेंद्र कुलकर्णी यांनी मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version