Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -गांधर्व मंच संगीत स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. “गांधर्व मंचाला जगभर ओळख आहे; मात्र पीसीएमसीला जगात कोणी ओळखत नाही,” असे विधान त्यांनी केले. या वक्तव्यानंतर उपस्थित पत्रकारांनी तत्काळ आक्षेप नोंदवत आयुक्तांना प्रश्न विचारले व नाराजी व्यक्त केली.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ व अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २ एप्रिल ते ७ जून दरम्यान गंधर्व मंच संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संतपीठ परिसरात होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त, संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त तसेच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या स्थापनेच्या १२५ वर्षांच्या निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मात्र, ही माहिती देताना आयुक्त सूर्यवंशी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने कार्यक्रमाच्या उद्देशावर पाणी फेरल्याची चर्चा रंगली. शहराच्या प्रतिमेबाबत नकारात्मक भूमिका दर्शविणारे हे विधान असल्याचा आरोप पत्रकारांकडून करण्यात आला. काही पत्रकारांनी “पीसीएमसी ही औद्योगिक व शैक्षणिकदृष्ट्या प्रगत शहरांपैकी एक असून, असे वक्तव्य योग्य नाही,” अशी भूमिका मांडत निषेध व्यक्त केला.
दरम्यान, आयुक्तांच्या या वक्तव्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version