Spread the love

 

वडगाव मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्यासाठी पंचायत समिती मावळ येथे सर्व विभागांची सविस्तर आढावा बैठक पार पडली. आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत तालुक्यातील प्रलंबित तसेच सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सखोल आढावा घेण्यात आला.

बैठकीत ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करणे, तसेच वीज बिलामुळे खंडित झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना आमदार सुनील शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. नागरिकांना नियमित व सुरक्षित पाणीपुरवठा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिक्षण क्षेत्राच्या आढाव्यात शाळांमधील पोषण आहाराची गुणवत्ता राखणे, शिक्षकांची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी मूलभूत सुविधा सक्षम असणे आवश्यक असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

आरोग्य विभागाच्या आढाव्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांतील सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत निर्देश देण्यात आले, तर प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांची कामे वेळेत पूर्ण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. आमदार निधीतील विकासकामे गुणवत्ता राखून निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
याशिवाय महिला बचत गटांना प्रोत्साहन देणे, अंगणवाडी इमारतींची कामे गतीने पूर्ण करणे आणि परिसरातील घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबविण्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी या घटकांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

तालुक्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे हा प्रशासनाचा प्राधान्यक्रम असावा, असे आमदार सुनील शेळके यांनी स्पष्ट करत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version