Spread the love

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग ) – आर्थिक क्षेत्रातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या १६ एप्रिल रोजी मुंबई येथे कामगार आयुक्त कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पुण्यात विविध संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आयोजित या बैठकीत बँकिंग, विमा व आर्थिक क्षेत्रातील विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये नोबो (NOBW), ग्रामीण बँक कर्मचारी/अधिकारी संघटना, सहकारी बँक संघटना, एलआयसी, नॅशनल इन्शुरन्स आदी संघटनांचा समावेश होता.

बैठकीत भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष अॅड. अनिल ढुमणे, जनरल सेक्रटरी किरण मिलगीर, उपाध्यक्ष सुधांशु रानडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच नोबोच्या अध्यक्षा तृप्ती आळती यांनीही कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या समस्या मांडल्या. बैठकीचे संयोजन रविंद्र देशपांडे यांनी केले.
या वेळी बँकिंग क्षेत्रात पाच दिवसांचा आठवडा लागू करणे, नियमित कामाचे तास निश्चित करणे, वाढत्या टार्गेटमुळे निर्माण होणारा मानसिक तणाव व work-life balance चा प्रश्न, कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा, तसेच पेंशन वाढ यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. याशिवाय केंद्र सरकारच्या Performance Linked Incentive (PLI) योजनेमुळे अधिकारी, कर्मचारी व व्यवस्थापनामध्ये तफावत निर्माण होण्याची शक्यता असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.

प्रलंबित मागण्यांसाठी संबंधित विभागांना निवेदने देणे, तसेच आस्थापना स्तरावर जनजागरण मोहीम, बैठका आणि माध्यमांतून प्रचार-प्रसार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच १६ एप्रिल रोजी मुंबईत होणाऱ्या आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली असून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version