तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या वतीने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तळेगाव, चाकण, कान्हे, उर्से, टाकवे औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, युवा उद्योजक रणजीत काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हा नोकरी महोत्सव येत्या २८ मार्च रोजी सकाळी ०९ ते सायंकाळी ०५ या वेळेत तळेगाव दाभाडे येथील यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, इंद्रायणी महाविद्यालय येथे होणार आहे. या नोकरी महोत्सवाचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते होणार असून, या कार्यक्रमाला इंद्रायणी विद्यमंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, डीएमसीएफएस’चे कार्यकारी संचालक डॉ. संजय झोपे, उद्योजक संजय साने, संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, तहसीलदार वैशाली वाघमारे, आरएमके स्पेसेसचे संचालक युवा उद्योजक रणजीत काकडे, उद्योजक विशाल लोखंडे, उद्योजक महेश निंबाळकर आदी उपस्थित राहणार आहेत.
यामध्ये पाचवी ते दहावी, बारावी, डिप्लोमा, आयटीआय, इंजीनियरिंग, बी.एस.सी., एम.एस.सी., बी.ए., बी.कॉम, बी.बी.ए., बी.सी.ए. उत्तीर्ण असलेल्यांना रोजगाराची संधी मिळणार आहे. याचा जास्तीत जास्त युवक युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या नोकरी महोत्सवाचे नियोजन ऍड. अभिजीत आवारे, विशाल लोखंडे व महेश निंबाळकर, तसेच इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, युवा उद्योजक रणजित काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे.
