Spread the love

 

कष्टकरी संघर्ष महासंघाच्या आंदोलनाला यश – काशिनाथ नखाते

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रातील कामगारांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत १२ तास कामाचे प्रस्तावित विधेयक अखेर मागे घेण्यात आले असून या निर्णयाचे राज्यभर स्वागत करण्यात येत आहे. कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने कामाच्या तासवाडीला तीव्र विरोध करत आंदोलन केले होते अखेर सरकारने हा निर्णय घेतला कामगारांनी या निर्णयाचा आनंद साजरा करत साखर वाटून स्वागत करण्यात आले.

राज्य शासनाने दुकाने, खाजगी आस्थापना आणि कारखान्यांमधील कामाचे तास वाढवण्यास मंजुरी दिल्यानंतर कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे याला तीव्र विरोध करण्यात आला होता. पिंपरी-चिंचवड आणि मुंबई येथे आंदोलन तसेच निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्यात आला. अखेर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधानसभेत हे विधेयक मागे घेण्याचा प्रस्ताव मांडला, जो मंजूर करण्यात आला.

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना कामगार नेते काशिनाथ नखाते म्हणाले की, “हा कामगारांच्या एकजुटीचा आणि संघर्षाचा विजय आहे. कामगारांच्या हितासाठी आम्ही नेहमीच लढत राहू.”

राज्य सरकारने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमात सुधारणा करत कामाचे तास वाढवण्याचा प्रस्ताव मांडला होता. किरकोळ दुकानांमध्ये १० तास, तर कार्यालयीन व कारखान्यातील कामकाज ८ तासांवरून १२ तासांपर्यंत वाढवण्याच्या तरतुदींना कामगारांनी विरोध केला. विश्रांतीविना ६ तास काम करण्याची मुभा देण्याचाही प्रस्ताव होता.

कामगार संघटनांनी या विरोधात ठाम भूमिका घेत “८ तास काम, ८ तास विश्रांती आणि ८ तास कुटुंबासाठी” हे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य असलेले सूत्र अधोरेखित केले. १२ तासांच्या कामामुळे कुटुंब, मुलांचे शिक्षण आणि कामगारांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा मुद्दा यावेळी मांडण्यात आला.

अखेर सरकारने कामगारांच्या भावना लक्षात घेत विधेयक मागे घेतल्याने कष्टकरी संघर्ष महासंघासह सर्व कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या लढ्यात सहभागी झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि कामगारांचे अभिनंदन करत नखाते यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, इरफान चौधरी,भास्कर राठोड, विनोद गवई , अनिल मोरे, अशोक कदम, अनंत कदम , सुनील काळे, विजय भोसले, सुनील गायकवाड यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version