Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा तब्बल ९३२२.१७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. स्थायी समितीमार्फत सादर करण्यात आलेल्या या अंदाजपत्रकात ४१४.२२ कोटी रुपयांची वाढ सुचविण्यात आली असून, शहराच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी हा अर्थसंकल्प महापौर रवी लांडगे यांच्याकडे सादर केला. मंगळवारी (दि.२४) झालेल्या सभेत यास मंजुरी देण्यात आली. यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसचिव मुकेश कोळप यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विविध स्रोतांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. बांधकाम परवानगी विभागातून २५८ कोटी रुपयांची वाढ अपेक्षित असून, ‘ना हरकत’ दाखले प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याने बांधकाम प्रकल्पांना वेग मिळणार आहे. याशिवाय मालमत्ता करातून ५० कोटी, होर्डिंग परवान्यांतून ३४ कोटी, पाणीपट्टीतून २० कोटी अशी वाढ अपेक्षित आहे.

प्रभागनिहाय विकासावर भर
शहरातील ३२ प्रभागांमध्ये सुमारे ११०० नवीन कामांचा समावेश करण्यात आला असून, त्यासाठी १९६.९० कोटींची तरतूद आहे. याशिवाय प्रत्येक नगरसेवकाला स्थानिक तातडीच्या कामांसाठी १० लाख रुपयांचा स्वतंत्र निधी देण्यात येणार आहे. १२८ नगरसेवकांसाठी एकूण १३ कोटींची तरतूद करण्यात आली असून, यामुळे रस्ते, गटारे, पदपथ आणि उद्यान विकासाची कामे गतीने पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
पाणीपुरवठा व पायाभूत सुविधा
पवना धरणातून निगडीपर्यंत समांतर जलवाहिनी प्रकल्पासाठी १०० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून, यावर्षी ४० कोटींची तरतूद आहे. सध्या शहराला ६५८ एमएलडी पाणीपुरवठा होत असून, गळती रोखणे आणि शुद्ध पाणी उपलब्ध करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

महत्त्वाच्या योजना व प्रकल्प
महिला स्वसंरक्षण केंद्र (५ कोटी), डिजिटल शाळा (२ कोटी), रतन टाटा संग्रहालय (२ कोटी), ‘अजितसृष्टी’ स्मारक (५ कोटी), आरोग्य हेल्पलाईन (३ कोटी), सोलर प्रकल्प (५ कोटी), पवना रिव्हर फ्रंट (१५ कोटी), मलनिस्सारण सुधारणा (२० कोटी) आणि ई-व्ही चार्जिंग स्टेशन (१.५ कोटी) अशा विविध प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले आहे.
सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम
बेघरांसाठी निवारे, सॅनिटरी नॅपकिन मशीन, ऑक्सिजन पार्क, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कामगार कट्टे आणि हॉकर्स झोन अशा उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी जपण्यावर भर देण्यात आला आहे.
वाहतूक व्यवस्थेत सुधारणा
शहरातील चौक सिग्नलमुक्त करण्याचे नियोजन, ‘पे अँड पार्क’ धोरण, तसेच बीआरटी मार्गांमधून उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर प्रकल्पांनाही चालना देण्यात येणार आहे.

भटक्या श्वानांसाठी उपाययोजना
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५ हजार श्वान क्षमतेची निवारागृहे उभारण्यासाठी ६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
एकूणच, या अर्थसंकल्पातून पिंपरी-चिंचवड शहराच्या पायाभूत सुविधा, पर्यावरण, आरोग्य आणि स्थानिक विकासाला गती देण्याचा महापालिकेचा प्रयत्न स्पष्ट होत आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version