Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपळे सौदागर परिसरातील मिलिटरी लगतचा बॅक साईडचा रस्ता अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागत होता. स्थानिक शेतकरी आणि अल्को सोसायटी तसेच साई पर्ल सोसायटीतील रहिवाशांमध्ये झालेल्या गैरसमजुतीमुळे हा रस्ता बंद करण्यात आला होता. परिणामी, दैनंदिन वाहतूक, शाळा-कामावर जाणे तसेच आपत्कालीन सेवांसाठी नागरिकांना पर्यायी लांब मार्गांचा वापर करावा लागत होता.

या समस्येबाबत अल्को सोसायटी व साई पर्ल सोसायटीच्या कमिटी सदस्यांनी मा. विरोधी पक्षनेते व नगरसेवक श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेत नाना काटे यांनी या विषयाची तातडीने दखल घेतली.
नंतर नाना काटे यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत स्थानिक शेतकरी, सोसायटीचे पदाधिकारी, कमिटी सदस्य व नागरिक यांची संयुक्त बैठक आयोजित केली. बैठकीदरम्यान सर्व संबंधित पक्षांशी सकारात्मक संवाद साधत त्यांनी मध्यस्थीची भूमिका बजावली. दोन्ही बाजूंचे मुद्दे शांततेत ऐकून घेत परस्पर सहमतीने तोडगा काढण्यात आला.
या चर्चेनंतर सर्वांच्या संमतीने बंद असलेला रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली समस्या मार्गी लागली असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या प्रसंगी स्थानिक शेतकरी, अल्को सोसायटी व साई पर्ल सोसायटीचे फ्लॅटधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी नाना काटे यांच्या तत्परतेचे आणि सकारात्मक हस्तक्षेपाचे कौतुक केले असून, भविष्यातही अशाच प्रकारे समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version