Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील विविध विकास कामे निधीअभावी रखडली आहेत. पिण्याचे पाणी, रस्ते, स्वच्छतेचा अभाव आहे. असुविधांनी नागरिक त्रस्त आहेत. त्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्लीत संरक्षण विभागाच्या महानिदेशक शोभा गुप्ता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

खासदार बारणे यांनी महानिदेशक गुप्ता यांची भेट घेऊन देहूरोडमधील रखडलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली. मावळ लोकसभा मतदारसंघात देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश आहे. मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते, स्ट्रीट लाईट (पथदिवे), पिण्याचे पाणी, प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांची निर्मिती करणे आवश्यक आहे. भविष्यातील पाणी संकट लक्षात घेऊन सद्यस्थितीतील पाणी वितरण प्रणाली, साठवण क्षमता सक्षम करणे आवश्यक आहे. नवीन जलवाहिनी टाकण्याची आवश्यकता आहे. बोर्डाच्या हद्दीतील काही गावांमध्ये जाण्यासाठी रस्ते नाहीत. कच्चे रस्ते आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण, आरोग्य सुविधांचा लाभ घेण्यासाठी येताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पक्के रस्ते तयार करण्याची आवश्यकता आहे. बोर्डाने २०२३ मध्येच दक्षिण कमांडकडे रस्ता निर्माण करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.  शीतळानगर येथील श्रीराम मंदिर परिसरात उद्यान, योग आणि ध्यान केंद्र, वॉकिंग ट्रॅक, गोशाळा, आणि सांस्कृतिक सभागृह उभारावे. 

लहान मुले व युवकांसाठी धावपट्टी (रनिंग ट्रॅक), तसेच व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, क्रिकेट आदी खेळांसाठी मैदान विकसित करावे.देहूरोड बाजारपेठेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारण्यास मान्यता द्यावी. स्वर्गीय मीनाताई ठाकरे उद्यान विकसित करावे. शेलारवाडी येथील अमरजाई देवी पालखी मार्गावर स्वागत कमान उभारावी आणि तिला गावातील अध्यात्मिक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते नबाजी भाऊगुजे शेलार यांचे नाव द्यावे.  शेलारवाडी येथे श्री स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालयात विज्ञान प्रयोगशाळा सुरु करावी. बोर्डातील पाणीपुरवठा, शिक्षण, स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन देण्याचे आदेश देण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली.

पालखी मार्गाचे चौपदरीकरण

श्री क्षेत्र देहूगाव ते देहूरोडपर्यंत पालखी मार्गाचे चौपदरीकरण करणे आवश्यक आहे. श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी होतात. अरुंद मार्ग असल्याने वारकऱ्यांना चालताना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी

पालखी मार्गाचे चौपदरीकरण करावे. सेंट्रल चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल उभारण्याची गरज आहे. येथील बस स्थानकावर शेल्टर निर्माण करण्याची आवश्यकता आहे. याबाबत संबंधितांना निर्देश देण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version