Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जानेवारी २०२६ मध्ये पार पडलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. २८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनेलसाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात आणि निष्ठेने काम केले. या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष उपक्रम राबविण्यात आला.

प्रभागातील पॅनेल प्रमुख तसेच माजी विरोधी पक्षनेते मा. विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या मार्गदर्शनाखाली, पिंपळे सौदागर येथील हॉटेल व्यावसायिक आणि त्यांचे खंदे समर्थक श्री. संतोष मल्हारी काटे उर्फ महाराज यांनी कार्यकर्त्यांसाठी आकर्षक बक्षीस योजना जाहीर केली होती. या अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी नवीन बुलेट दुचाकी बक्षीस ठेवण्यात आले होते.

प्रभागातील सुमारे ३०० सक्रिय कार्यकर्त्यांमधून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘नाना काटे मित्र परिवार’च्या वतीने लकी ड्रॉ काढण्यात आला. या सोहळ्याला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली होती. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या लकी ड्रॉमध्ये प्रभागातील  सचिन ढेपे यांचे नाव विजेते म्हणून जाहीर करण्यात आले.
यानंतर नाना काटे मित्र परिवाराच्या हस्ते सचिन ढेपे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना नव्या कोऱ्या बुलेट दुचाकीची चावी प्रदान करून गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या कामाला मिळालेल्या या प्रोत्साहनामुळे आगामी काळातही अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

या अनोख्या उपक्रमामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून, राजकीय क्षेत्रात कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल घेण्याची ही सकारात्मक परंपरा असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version