पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी येथील झुलेलाल मंदिरात सिंधी समाजाच्या वतीने शिरोमणी स्वामी लिलाशाह महाराज यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने सिंधी समाजातील महत्त्वाचा मानला जाणारा जनऊ संस्कार सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला.
या कार्यक्रमात सुमारे दहा मुलांवर जनऊ संस्कार विधी करण्यात आला. विशेष म्हणजे हा संस्कार पूर्णपणे विनामूल्य आयोजित करण्यात आला होता. यावेळी होम-हवन, भजन आणि कीर्तन यांचेही आयोजन करण्यात आले होते.
परमपूज्य हेमंतपुरी महाराज यांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सुमारे चार ते पाच हजार भाविकांनी त्याचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभू तीर्थानी, दीपक लोहाना, मोती रामवानी, गोपाल तिलोकानी, मोहन खेमचंदानी, जॉनी थडानी, सोनू नागपाल तसेच शनी मंदिर ग्रुप आणि जेएमडी ग्रुपच्या कार्यकर्त्यांचे विशेष सहकार्य लाभले.
हा धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
