मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – फेरीवाल्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नवनियुक्त महापौर रितू ताई तावडे यांची महानगरपालिका भवन येथे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी भेट घेतली. यावेळी फेरीवाल्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या भेटीत अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या आणि सर्वेक्षणामध्ये नाव असलेल्या फेरीवाल्यांवर कोणताही अन्याय होणार नाही,असे आश्वासन महापौर रितू तावडे यांनी दिले. शहराच्या अर्थव्यवस्थेत आणि दैनंदिन जीवनात फेरीवाल्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून त्यांच्या हक्कांचे संरक्षण होणे आवश्यक असल्याचे व रहदारीला अडथळा न करता व्यवसाय करावा असे त्यांनी नमूद केले.
यावेळी नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन,फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने पथ विक्रेता कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी यासाठी बैठकीचे नियोजन करावे.तसेच फेरीवाल्यांचे सर्वेक्षण आणि ओळखपत्र वितरणाची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी अशी मागणी करण्यात आली. फेरीवाल्यांना न्याय, सन्मान आणि सुरक्षित व्यवसायाचे वातावरण मिळावे यासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध असल्याचे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी सांगितले.
