पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अहिर सुवर्णकार समाज महिला मंडळ, पुणे यांच्या वतीने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर देशसेवेसाठी समर्पित कार्य करणाऱ्या वीर पत्नी व वीर माता श्रीमती सुमेधाताई चिथडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महालक्ष्मी सभागृहात आयोजित या कार्यक्रमात सुमेधा चिथडे यांनी सैनिकांसाठी केलेल्या कार्याचा प्रेरणादायी प्रवास समाजासमोर उलगडला. त्यांच्या अनुभवकथनाने सभागृहातील उपस्थित श्रोते भारावून गेले.
सुमेधा चिथडे आणि त्यांचे पती स्वर्गीय योगेश चिथडे यांना भारतीय सैन्याबद्दल विशेष जिव्हाळा होता. सियाचेनमधील कठीण परिस्थितीत तैनात असलेल्या सैनिकांना ऑक्सिजनची गंभीर समस्या असल्याचे समजल्यानंतर त्यांनी तेथे ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्धार केला. लोकसहभागातून निधी उभारण्यासाठी सुमेधाताईंनी स्वतःचे दागिने विकून “पावनभिक्षा” हा उपक्रम सुरू केला. त्यांच्या प्रयत्नातून SIRF (Soldiers Independent Rehabilitation Foundation) ही संस्था स्थापन करण्यात आली. चार वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर ४ ऑक्टोबर २०१९ रोजी सियाचेनमध्ये सुमारे अडीच कोटी रुपयांचा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात यश आले. त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्येही दुसरा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला.
या कार्यादरम्यान सियाचेनच्या कठीण वातावरणाचा परिणाम होऊन योगेश चिथडे यांची तब्येत खालावली आणि जुलै २०२२ मध्ये त्यांचे निधन झाले. मात्र पतीच्या निधनानंतरही सुमेधाताईंनी सैनिकांसाठीचे कार्य थांबवले नाही. मिलिटरी हॉस्पिटलसाठी सोलर वॉटर हिटिंग सिस्टीम, अपंग सैनिकाच्या मुलीसाठी व्हीलचेअर, सैनिकांच्या मुलांच्या शाळेसाठी बस अशी विविध मदत त्यांनी केली आहे. तसेच सैनिकांना राख्या, दिवाळी फराळ आणि कोविड काळात मास्क पाठवण्यासारखे उपक्रम त्या सातत्याने राबवत आहेत.
यावेळी बोलताना सुमेधाताईंनी समाजासमोर राष्ट्रप्रेमाची जाणीव जागवण्याची गरज व्यक्त केली. “राष्ट्र प्रथम” ही भावना प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सैनिकांचे कार्य आपण सतत स्मरणात ठेवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. भविष्यातही सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध योजना राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आणि समाजाने या कार्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
देश आणि सैनिकांसाठी समर्पित असलेल्या सुमेधाताई चिथडे यांच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला समाजातील महिला-पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. अहिर सुवर्णकार महिला मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय उर्मिला पिंगळे आणि कार्यकारिणीने कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन केले.
