पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्रीडा, कला, सांस्कृतिक व साहित्य समिती बैठकीत निर्णय
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- “क्रीडा, कला, सांस्कृतिक व साहित्य समितीचे कामकाज अधिक नियोजनबद्ध आणि परिणामकारक करण्यासाठी समितीच्या वर्षभराच्या उपक्रमांचे आगाऊ नियोजन करण्यात येईल, तसेच समितीच्या सर्व उपक्रम किंवा कार्यक्रमांसाठी एक सर्वसमावेशक धोरण तयार केले जाईल. हे धोरण समितीतील सर्व सदस्यांच्या सहमतीने निश्चित करून त्याच आधारे आगामी काळात समितीचे कामकाज आणि विविध कार्यक्रम राबविण्यात येतील’’, अशी माहिती क्रीडा, कला, सांस्कृतिक व साहित्य समितीचे सभापती कैलास कुटे यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा, कला, सांस्कृतिक व साहित्य समितीची बैठक महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे समितीचे सभापती कैलास कुटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत शहरातील क्रीडा, सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविणे, खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच समितीच्या कामकाजाचे नियोजनबद्ध स्वरूप ठरविणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस महापालिकेचे विरोधी पक्षनेते तथा क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सदस्य भाऊसाहेब भोईर यांच्यासह जितेंद्र ननावरे, शाम जगताप, तानाजी बारणे, धर्मपाल तंतरपाळे, उदय गायकवाड, योगेश लांडगे, प्रमोद कुटे तसेच नगरसचिव मुकेश कोळप, उप आयुक्त पंकज पाटील, चेतना केरूरे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महापालिका कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत शहरातील क्रीडा, कला आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यावर एकमत व्यक्त करण्यात आले.
बैठकीदरम्यान क्रीडा विभागाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेत विविध सूचना देण्यात आल्या. शहरातील महापालिकेचे सर्व जलतरण तलावांमधील पाण्याची गुणवत्ता राखणे अत्यंत आवश्यक असल्याने प्रत्येक तलावातील पाण्यातील क्लोरीनची पातळी नियमित तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच नागरिकांना त्याबाबत स्पष्ट माहिती मिळावी यासाठी संबंधित जलतरण तलावांवर सूचनाफलक लावण्याचे निर्देश देण्यात आले.
क्रीडा विभागाच्या सध्याच्या धोरणाचा सविस्तर अहवाल समितीसमोर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. या अहवालाचा समिती सदस्यांकडून अभ्यास करून आवश्यक ते बदल सर्व सदस्यांच्या संमतीने करण्यात येतील, असेही बैठकीत ठरविण्यात आले. याशिवाय समितीच्या वर्षभराच्या कामकाजाचे नियोजन आगाऊ तयार करून त्याबाबत ठराव मंजूर करण्यावरही भर देण्यात आला. समितीच्या सर्व उपक्रमांसाठी एक स्वतंत्र धोरण निश्चित करण्यात येणार असून त्या धोरणाच्या आधारे सर्व सदस्यांच्या सहभागातून विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विविध उपक्रमांचे विकेंद्रीकरण न करता सर्व सदस्यांच्या सहभागातून नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम आयोजित करण्याचा यामागचा उद्देश असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
शहरातील सांस्कृतिक क्षेत्राला चालना देण्यासाठी महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये स्थानिक कलाकारांना प्राधान्य देण्यावरही भर देण्यात आला. नाट्यगृहांमध्ये इतर ठिकाणच्या कलाकारांच्या छायाचित्रांऐवजी शहरातील स्थानिक कलाकार, कलावंत आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची छायाचित्रे लावावीत, अशी सूचना करण्यात आली. याशिवाय, शहरात विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी अनेक खेळाडू येत असतात. मात्र त्यांच्या निवासाची योग्य सोय नसल्याची बाब लक्षात घेऊन खेळाडूंसाठी स्वतंत्र वसतीगृह उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच पिंपरी चिंचवड शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरजही बैठकीत व्यक्त करण्यात आली.
नेहरूनगर येथील आण्णासाहेब मगर स्टेडियमच्या प्रलंबित कामांना गती देऊन ते लवकरात लवकर पूर्ण करण्यावरही विशेष भर देण्यात आला. शहरातील क्रीडापटूंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापालिकेच्या सर्व शाळांमधील मैदाने सुट्टीच्या दिवशी मुलांसाठी खेळण्यासाठी खुली करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची सूचनाही करण्यात आली. तसेच १ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या कामगार दिनानिमित्त शहरातील विविध ठिकाणी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यामुळे कामगारांना त्यांच्या योगदानाचा सन्मान देतानाच शहरात सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असे मत व्यक्त करण्यात आले.
शहरात विविध खेळांच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षकांची कमतरता असल्याची बाबही बैठकीत मांडण्यात आली. त्यामुळे खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रशिक्षकांची संख्या वाढविण्याबाबत संबंधित विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले. याशिवाय, अनेक खेळाडूंना खेळताना दुखापती होतात आणि उपचारासाठी लागणारा खर्च परवडत नसल्यामुळे ते उपचारांकडे दुर्लक्ष करतात. ही बाब लक्षात घेऊन खेळाडूंसाठी विशेष विमा योजना सुरू करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच विविध क्रीडा संकुल आणि मैदाने येथे सुरक्षारक्षकांची कमतरता असल्यामुळे सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
दरम्यान, बैठकीत यमुनानगर येथील माँसाहेब सौ. मिनाताई ठाकरे जलतरण तलाव तसेच मोहननगर येथील श्री. छत्रपती राजश्री शाहू महाराज जलतरण तलाव ३ वर्षांसाठी भाडे तत्वावर चालविण्यास देण्याबाबतचा ठराव स्थायी समितीसमोर सादर करण्यासाठी मंजूरी देण्यात आली.
