Spread the love

 

फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यभरातील फेरीवाले मुंबईत

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुंबईतील आझाद मैदान येथे आज महाराष्ट्रातील फेरीवाल्यांनी आपल्या हक्कांसाठी जोरदार एल्गार केला. नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर फेडरेशन आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात राज्यातील विविध जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने फेरीवाले सहभागी झाले होते.

मुंबईसह राज्यातील विविध शहर आणि उपनगरांमधून आलेल्या फेरीवाल्यांनी जोरदार घोषणा देत फेरीवाला कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी केली. आंदोलनामुळे आझाद मैदान परिसर घोषणांनी दणाणून गेला.

महाराष्ट्र हॉकर फेडरेशनचे कार्याध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी सांगितले की, सरकार एखादा कारखाना किंवा कंपनी सुरू करण्यासाठी काही दिवसांत परवानगी देते; मात्र सर्वसामान्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न असलेल्या सन २०१४ मध्ये संसदेत मंजूर झालेल्या पथ विक्रेता कायद्याची अजूनही योग्य अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे हा कायदा तातडीने प्रभावीपणे लागू करावा, अशी मागणी करण्यात आली.

तसेच कलम ३८ नुसार योजना तयार करावी, प्रत्येक महापालिका क्षेत्रात तक्रार निवारण समिती स्थापन करावी आणि मुंबईसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर होणाऱ्या चुकीच्या व अन्यायकारक कारवाया थांबवाव्यात, अशा प्रमुख मागण्या आंदोलनातून करण्यात आल्या.

या आंदोलनात महाराष्ट्र हॉकर फेडरेशनचे कार्याध्यक्ष काशिनाथ नखाते, सचिव विनिता बाळेकुंद्री, कॉ. प्रकाश रेड्डी, संजय खांडे, बबन कांबळे, पथ विक्रेता समिती सदस्य राजू बिराजदार, किरण साडेकर, किसन भोसले, तसेच महासंघाचे पदाधिकारी कालिदास गायकवाड, सलीम शेख, राजू पठाण, सखाराम केदार, रज्जाक शेख, सुनील भोसले, रमजान शेख, कैलास वैष्णव,सुरेश जाधव, प्रल्हाद बागुल, परमेश्वर बिराजदार, जयश्री शिंदे, लाला राठोड, प्रमोद रौंदळ, मनोज यादव,लक्ष्मण दुर्गुडे, सिद्धमा पुजारी, हरी भोई यांसह विविध फेरीवाला संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version