मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा वाहतुकीमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असून याबाबत विधान परिषदेत आमदार उमा गिरीश खापरे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यांवर होणारी कोंडी, अपघातांचा धोका आणि स्थानिक नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी याकडे आमदार उमा खापरे यांनी सरकारचे लक्ष वेधले.
या प्रश्नावर उत्तर देताना राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रशासनाकडून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून कारवाई सुरू असून आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून कोळशाचे बारीक कण रस्त्यावर पडू नयेत यासाठी ट्रकवर मजबूत ताडपत्री लावण्याचे निर्देश दिले जाणार आहेत. प्रत्येक वाहनावर जीपीएस प्रणाली बसविण्याबाबतही उपाययोजना केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खराब झालेले रस्ते, वाहनांचे ओव्हरलोडिंग आणि वाढते प्रदूषण या बाबींवर लवकरच संबंधित विभागांची बैठक घेऊन कडक उपाययोजना केल्या जातील, असेही मंत्री देसाई यांनी सांगितले. आमदार उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा वाहतुकीच्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले गेले आहे.
