Spread the love

 

पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न

भारतासह जर्मनी, इटली, स्पेन, पोलंड, ब्राझिल, युएई यासह ४३ देशांमधील ११६ पेक्षा अधिक चित्रपट, लघुपट, माहितीपट महोत्सवात प्रदर्शित

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात केरळ राज्यातील मल्याळम भाषेतील आशयसंपन्न ‘मलवाझी’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकावत महोत्सवात विशेष ठसा उमटवला. तर मराठी भाषेतील ‘अ स्टोरी कार्वेड ऑन अ ट्री’ या संवेदनशील मांडणी असलेल्या लघुपटाने प्रेक्षक आणि परीक्षकांची मने जिंकत सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार पटकावला. अॅनिमेशन विभागात राजस्थान येथील ‘द वेट वॉल’ या चित्रपटाने आपली वेगळी छाप पाडत सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन फिल्मचा मान मिळवला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दुलाल रॉय व प्रणव जोशी यांना, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिथिला हिरेमठ यांना प्रदान करण्यात आला. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या ‘साबर बोंडं’ या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहन कानवडे यांना ‘पीसीआयएफएफ युवा प्रेरणादायी सिने आयकॉन पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. या महोत्सवात भारतासह जर्मनी, इटली, स्पेन, पोलंड, ब्राझिल, युएई यासह ४३ देशांमधील ११६ पेक्षा अधिक चित्रपट, लघुपट, माहितीपट, अॅनिमेशन चित्रपट आणि ६० सेकंदांचे चित्रपट प्रदर्शित करण्यात आले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने आणि पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी, गाथा फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने तसेच महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, कला व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६’चा पुरस्कार वितरण समारंभ दिमाखात संपन्न झाला. आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पार पडलेल्या या सोहळ्यात देश-विदेशातील कलावंतांना विविध विभागांतील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर, क्रीडा, कला व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, नगरसदस्या प्रियंका कुदळे यांच्यासह महापालिका उपायुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, चित्रपट निर्माते नितीन वैद्य, अभिनेते श्रीकांत यादव, दिग्दर्शक तेजस देऊसकर, अभिनेते इनाम उल हक, दिग्दर्शक रोहन कानवडे, गोरख कातोरे, सोमनाथ शितोळे, डॉ. पांडुरंग भोसले, चित्रपट समीक्षक नरेंद्र बंडाबे, श्रीकांत आगवणे, मोदीत सिंघल, पल्लवी सिंघल, पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटीचे दत्ता गुंड, अभिषेक अवचार, डॉ. विश्वास शेंबेकर, जय भोसले, गाथा फिल्म सोसायटीचे पूजा गुंड, श्रुती शेंबेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

या पुरस्कार वितरण सोहळ्यात नामवंत ज्यूरीच्या निवडीनुसार विविध विभागांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके आणि सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले. चित्रपट, लघुपट, माहितीपट, अॅनिमेशन, व्हिडिओ सॉंग आणि ६० सेकंद चित्रपट अशा विविध विभागांमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अशा सांस्कृतिक उपक्रमांना पाठबळ देत आहे ही आनंदाची बाब आहे. नव्या कलाविष्कारांना व्यासपीठ मिळावे, कलाकारांना प्रोत्साहन मिळावे आणि शहरात सांस्कृतिक चळवळीला चालना मिळावी, यासाठी अशा महोत्सवांचे आयोजन महत्त्वाचे ठरत आहे. विविध आशय, तांत्रिक दर्जा आणि कलात्मक मांडणी असणारे चित्रपट रसिकांना या निमित्ताने पाहण्यास मिळाले आहेत, असे देखील उपमहापौर शर्मिला बाबर यांनी सांगितले.

उपायुक्त पंकज पाटील म्हणाले, महापालिका आणि पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटीने आयोजित केलेल्या पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला यंदा शहरातील चित्रपट रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यंदा या महोत्सवात ४३ देश सहभागी झाले. शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा हा महोत्सव आहे. चित्रपट ही केवळ सर्जनशीलतेची नव्हे तर प्रगल्भ विचारांची खिडकी असून, या महोत्सवाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडमध्ये चित्रपट संस्कृतीला चालना मिळत आहे, असे देखील त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य कुलकर्णी यांनी केले.

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप “क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम” या आशयघन चित्रपटाने झाला. मराठी माध्यमातील शिक्षण, संस्कार आणि मातृभाषेच्या जपणुकीचा भावनिक व वास्तववादी प्रवास उलगडणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महोत्सवाच्या समारोपावेळी हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट रसिकांची विशेष उपस्थिती लाभली. कथानकातील आशय, प्रभावी सादरीकरण, मराठी शाळांची परंपरा, त्यातील मूल्याधिष्ठित शिक्षण आणि मराठी अस्मितेचा ठसा उमटवणाऱ्या मांडणीमुळे प्रेक्षकांनी चित्रपटाचे कौतुक केले. तसेच तीन दिवस रंगलेल्या या चित्रपट महोत्सवात विविध भाषांतील आणि विषयवैविध्य असलेल्या चित्रपटांचा आस्वाद विविध वयोगटातील चित्रपट रसिकांनी घेतला.

*विभागनिहाय प्रमुख विजेते*

• सर्वोत्कृष्ट चित्रपट – मलवाझी (केरळ, भारत)

• सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन फिल्म – द वेट वॉल (राजस्थान,भारत)

• सर्वोत्कृष्ट माहितीपट – ओस्लो (महाराष्ट्र, भारत)

• सर्वोत्कृष्ट ६० सेकंद चित्रपट – अ हाफ ऑफ हाफ हार्टेड (ब्राझिल)

– सर्वोत्कृष्ट लघुपट (प्रथम) – अ स्टोरी कार्वेड ऑन अ ट्री’ (महाराष्ट्र, भारत)

• सर्वोत्कृष्ट लघुपट (द्वितीय) – द व्हॉइस ऑफ ओल्ड (महाराष्ट्र, भारत)

– सर्वोत्कृष्ट लघुपट (तृतीय) – द अलटर इको (पश्चिम बंगाल, भारत)

*वैयक्तिक पुरस्कार*

• सर्वोत्कृष्ट अभिनेता – दुलाल रॉय (मरत्या) , प्रणव जोशी (कार्ड्स)

• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – मिथिला हिरेमठ (रोझेस आर, महाराष्ट्र, भारत)

• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – साईनाथ गाणुवाड (अ स्टोरी कार्वेड ऑन अ ट्री)

• सर्वोत्कृष्ट पटकथा – साईनाथ गाणुवाड (अ स्टोरी कार्वेड ऑन अ ट्री)

– सर्वोत्कृष्ट निर्मिती रचना – नेहा काणेकर (केकी)

• सर्वोत्कृष्ट ध्वनी – अनिश बासू (द आल्टर इको)

• सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – प्रथमेश रांगोळे (केकी)

• सर्वोत्कृष्ट संपादन – जागेश्वर दाभोळे (केकी)

*विशेष पुरस्कार व नामांकने*

ज्यूरी पुरस्कार (चित्रपट विभाग)

• बेस्ट फीचर फिल्म – मारिया

• बेस्ट डेब्यू डायरेक्टर – शेनेस

• सर्वोत्कृष्ट ज्यूरी पुरस्कार : लॉस्ट साँग ऑफ सुंदरी (माहितीपट – महाराष्ट्र, भारत), फिन (लघुपट, स्पेन), चक्री (महाराष्ट्र, भारत)

*विशेष नामांकने*

• ऑडियन्स चॉईस अवॉर्ड – अलमारी का आचार (लघुपट- दिल्ली, भारत)

• डायरेक्टर व्हिजन अवॉर्ड – अनिकेत फरांदे (दार)

सर्वोत्कृष्ट गीत

प्रथम – गणपती तू सर्वश्रेष्ठ

द्वितीय – मिस्ड डे

तृतीय – हायड्रोजन
…..

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version