Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा राज्याला विकासाच्या दिशेने नेणारा, शेतकऱ्यांना भरीव मदत करणारा आणि महिलांसाठी सुरू असलेल्या योजनांना कायम ठेवणारा विकासाभिमुख अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया यांनी दिली. मात्र उद्योग-व्यवसायाच्या विस्तारासाठी आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीसाठी ठोस योजना नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पात शेती विकासावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे पगारिया यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी डिजिटल सिटी सेवा योजना, वसुधा सेवा योजना, बळीराजा शेत पाणंद योजना, लागेल त्याला सौर कृषी पंप देण्याची योजना तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा निर्णय यांसारख्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. याशिवाय सुमारे ३० लाख शेतकऱ्यांना ‘महा ॲप’च्या माध्यमातून शेतीविषयक माहिती उपलब्ध करून देण्याची योजना देखील महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी तसेच सप्टेंबर २०२५ पर्यंतची थकबाकी माफ करण्याची योजना ही शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक ठरणार असल्याचे पगारिया म्हणाले. महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजना सुरू ठेवण्याची घोषणा आणि २५ लाख महिलांना ‘लखपती’ बनवण्याचा संकल्प याचेही महिला वर्गात स्वागत होईल, असे त्यांनी सांगितले.

पायाभूत सुविधांच्या दृष्टीने पुणे मेट्रो २ प्रकल्पाला मान्यता, नवी मुंबई ते मुंबई विमानतळ मेट्रो प्रकल्प, तळेगाव-चाकण व मुंबई-पुणे मार्गासाठी उन्नत मार्ग, पुरंदर येथील छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला गती, देहू विकास आराखड्याला मान्यता तसेच वाढवण बंदर परिसरात दुसरी मुंबई आणि अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई उभारण्याच्या योजना या राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या असल्याचे त्यांनी नमूद केले.

एकूणच हा अर्थसंकल्प विकासाभिमुख असला तरी उद्योग-व्यवसायाच्या विस्तारासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी अधिक ठोस उपाययोजना अपेक्षित असल्याचे मत डॉ. पगारिया यांनी व्यक्त केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version