Spread the love

 

पिंपरी ​, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध क्रीडा प्रकल्पांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि नागरिकांना अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा समिती सभापती कैलास कुटे यांनी आज सविस्तर पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे व सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. ​आज सकाळी १०:०० वाजता मोहननगर जलतरण तलावापासून या दौऱ्याची सुरुवात झाली. यावेळी त्यांच्यासोबत क्रीडा उपायुक्त पंकज पाटील, माजी नगरसेविका मीनल यादव, कार्यकारी अभियंता (क्रीडा स्थापत्य) विजय जाधव, कनिष्ठ अभियंता संदीप ठोकळे आणि प्र. क्रीडा अधिकारी रंगराव कारंडे उपस्थित होते.

​जलतरण तलावात सोलर पॅनल आणि अद्ययावत लॉकर सुविधा
​पाहणी दरम्यान सभापतींनी जलतरण तलावाच्या सुरक्षेवर विशेष भर दिला. तलावाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक नेमणे, नागरिकांच्या सुविधेसाठी लॉकर बॉक्स उपलब्ध करून देणे आणि महिला प्रसाधनगृहात एक्झॉस्ट फॅन बसवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच, वीज बचतीसाठी या ठिकाणी सोलर पॅनल बसवण्यात येणार असून लहान मुलांच्या बेबी टँकभोवती सुरक्षिततेसाठी रेलिंग बसवण्याचे आदेशही त्यांनी दिले.

*लॉन टेनिस आणि व्हॉलीबॉल मैदानांचे नूतनीकरण

​लॉन टेनिस कोर्टच्या शेजारील मोकळ्या जागेचा वापर करून तिथे क्रिकेटसाठी टर्फ तयार करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मैदानाभोवतीच्या वाळलेल्या झाडांच्या फांद्या कापण्यासाठी उद्यान विभागाशी त्वरित पत्रव्यवहार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रात्रीच्या वेळी खेळाडूंना सराव करता यावा यासाठी हायमास्ट दिवे बसवण्यावरही चर्चा झाली.

​व्यायामशाळांची दुरुस्ती करणार

​प्रबोधनकार ठाकरे व्यायामशाळेची पाहणी करताना, ओपन जिमची आवश्यक ती दुरुस्ती करण्याच्या सूचना सभापती कैलास कुटे यांनी दिल्या. तसेच आकाश काळभोर व्यायामशाळेतील मोकळ्या जागेत नवीन बांधकाम किंवा शेड मारून जागेचा विस्तार करण्याचे नियोजन आहे.

*उद्यानात ‘वाय-फाय’ आणि नवीन आसन व्यवस्था
​काळभोर नगर येथील शंकर शेट्टी उद्यानासह शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आणि शेड उभारण्याचे प्रस्तावित आहे. उद्यानात ओपन जिमच्या दुरुस्तीसाठी ठेकेदाराचा क्रमांक दर्शनी भागात लावण्याचे आदेश देण्यात आले, जेणेकरून नागरिक तक्रार करू शकतील. विशेष म्हणजे, बागेत बसवण्यात आलेल्या वाय-फाय बॉक्सची माहिती घेऊन नागरिकांना ती सुविधा उपलब्ध करून देणे आणि उद्यानांमध्ये तब्बल १००० नवीन बाके (बेंच) खरेदी करण्याबाबत उद्यान विभागाला कळविण्यात आले आहे.

“नागरिकांना आणि खेळाडूंना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. या दौऱ्यात आढळलेल्या त्रुटी दूर करून तातडीने विकासकामे पूर्ण केली जातील.”
— कैलास कुटे, सभापती, क्रीडा समिती.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version