पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज नागरिकांना थेट पाहता यावे यासाठी सभेचे ‘लाईव्ह’ (थेट) प्रक्षेपण सुरू करण्याची मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब सोपानराव भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर केले असून, आगामी सर्वसाधारण सभेपासून ही सुविधा सुरू करण्याची मागणी केली आहे.
भोईर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही राज्यातील महत्त्वाची आणि ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळखली जाणारी महानगरपालिका आहे. शहराच्या विकासासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय, विविध विकासकामांवरील चर्चा तसेच नागरिकांच्या कराच्या पैशांचे नियोजन हे सर्व निर्णय सर्वसाधारण सभेत घेतले जातात. त्यामुळे या सभेचे कामकाज नागरिकांना प्रत्यक्ष पाहता येणे अत्यंत आवश्यक आहे.
सध्याच्या डिजिटल युगात नागरिकांना त्यांच्या लोकप्रतिनिधींनी सभागृहात कोणते प्रश्न उपस्थित केले, कोणत्या विषयांवर चर्चा केली आणि प्रशासनाची निर्णय प्रक्रिया कशी चालते, याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यामुळे प्रशासनातील पारदर्शकता वाढविण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकृत युट्यूब चॅनेल किंवा फेसबुक पेजवरून सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुंबई आणि पुणे महानगरपालिकांमध्ये सभागृहाचे कामकाज थेट प्रक्षेपित करण्याची सुविधा उपलब्ध आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याने ही सुविधा सुरू करणे प्रशासनासाठी सहज शक्य आहे. त्यामुळे नागरिकांच्या हिताचा विचार करून आणि प्रशासनातील पारदर्शकता वाढविण्यासाठी आगामी सर्वसाधारण सभेपासून हे कामकाज ‘लाईव्ह’ करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे.
