दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत महोत्सवाचा होणार समारोप
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने आणि पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी व गाथा फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय महोत्सव २०२६’ मध्ये ५ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजता ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ या चित्रपटाचा विशेष प्रीमियर होणार आहे. त्यानंतर या महोत्सवाचा दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे हा कार्यक्रम होणार असून जास्तीतजास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ ची सुरुवात ३ मार्च रोजी झाली असून या महोत्सवाचे पारितोषिक वितरण गुरूवार, ५ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमूख उपस्थिती तसेच खासदार मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ.अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप, शंकर मांडेकर, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग सदस्य ॲड.गोरक्ष लोखंडे, महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे, शहर सुधारणा समिती सभापती संजय नाना काटे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर, आयुक्त श्रावण हर्डीकर, शहरातील नगरसदस्य, नगरसदस्या तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, उप आयुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटीचे दत्ता गुंड, अभिषेक अवचार, डॉ. विश्वास शेंबेकर, प्रा. डॉ. पांडुरंग भोसले, जय भोसले, गाथा फिल्म सोसायटी अध्यक्ष पुजा गुंड, श्रुती शेंबेकर यांची देखील उपस्थिती लाभणार आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमापूर्वी दुपारी 3 वाजता ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ या चितपटाचा प्रीमियर ठेवण्यात आला आहे. यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित राहणार आहे. नागरिकांनी देखील या चित्रपटाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिग्दर्शक रोहन कानवडे यांना दिला जाणार सिने आयकॉन पुरस्कार
पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ च्या पारितोषिक वितरण समारंभात ‘साबर बोंडं’ या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहन कानवडे यांना ‘पीसीआयएफएफ युवा प्रेरणादायी सिने आयकॉन पुरस्कार २०२६’ मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. याशिवाय या सोहळ्यात बेस्ट फिचर फिल्म, सर्वोत्कृष्ट माहितीपट, सर्वोत्कृष्ट लघुपट, सर्वोत्कृष्ट चित्रपट, ६० सेकंदाचा सर्वोत्कृष्ट लघुपट असे विविध पुरस्कार दिले जाणार आहेत.
