पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठी भाषा गौरवदिनाचे औचित्य साधून पुनावळे येथे शुक्रवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमी आणि गीत फुलोरा निर्मित ‘श्वास मराठी, विश्वास मराठी!’ या गीताचे बालकांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
अंबड येथील गोदावरी महाविद्यालयातील प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. अंबड येथील गोदावरी महाविद्यालयातील मराठी भाषा विभागप्रमुख प्रा. डॉ. पुरुषोत्तम जुन्ने लिखित या गीताला संगीतकार अभयार्पिता यांनी संगीतबद्ध केले असून त्याचे युगुलस्वरात गायन केले आहे. मराठी साहित्यातील संतसाहित्य ते तंतसाहित्य अर्थातच अभंग ते पोवाडा या काव्यप्रकारांची चपखल गुंफण असलेल्या या गीतातून मराठमोळ्या संगीताची सुरेल अनुभूती प्रत्ययास येते. याप्रसंगी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी कवितांच्या ‘गीत फुलोरा’ या सुश्राव्य मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. “लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी…” या गीताचे स्वरोपासना वाकड आणि पुनावळे शाखेतील विद्यार्थ्यांनी समूहगायन करून मैफलीची प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर ‘माहेर’ , ‘आई’ , ‘मनासारखे सारे घडते का?’ , ‘फुलराणी’ , ‘गाई पाण्यावर काय म्हणून आल्या?’ , ‘धरतीच्या कुशीमधी…’ , ‘माझ्या मराठी मातीचा’ , ‘माझ्या मराठीची गोडी’ अशा भावोत्कट कवितांचे अभय, अर्पिता आणि अथर्व यांनी गायन केले. ‘माझी मराठी भाषा’ या अभय – अर्पिता लिखित कवितेचे मेघालयातील हाजोंग भाषेत रूपांतरित करून तिचे करण्यात आलेले सादरीकरण हे या मैफलीतील विशेष आकर्षण ठरले.
देशातील आणि विदेशातील विद्यार्थ्यांमध्ये मराठीची गोडी निर्माण व्हावी म्हणून स्वरोपासना आणि गीत फुलोरा मराठी भाषेसाठी गेल्या वीस वर्षांपासून कवितांच्या माध्यमातून सांस्कृतिक जागर करीत असून ‘श्वास मराठी, विश्वास मराठी!’ हे गीत geetfulora यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आले असून सर्व मराठीप्रेमींनी ते आवर्जून ऐकावे, असे आवाहन करण्यात आले. विकास आणि अलोक यांनी ताल वाद्यांवर साथसंगत केली. अथर्व कुलकर्णी यांनी मैफलीचे निवेदन केले.
