Spread the love

पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या ग्लोबल बिझनेस स्कूल आणि रिसर्च सेंटरमध्ये आयोजन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या अधिपत्याखालील ग्लोबल बिझनेस स्कूल अँड रिसर्च सेंटर येथे दि. २६ व २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली. “डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ” या समकालीन विषयावर आधारित या परिषदेने देश-विदेशातील शिक्षणतज्ज्ञ, उद्योगक्षेत्रातील मान्यवर, धोरणकर्ते व संशोधकांना एकाच व्यासपीठावर आणले.

दोन दिवसीय परिषदेतील चर्चासत्रांमध्ये नवोन्मेष, शाश्वत विकास आणि सुशासन या विषयांवर सखोल विचारमंथन झाले. डिजिटल परिवर्तन आणि हरित वाढ यांच्या माध्यमातून सशक्त, समावेशक व शाश्वत जागतिक अर्थव्यवस्था कशी उभारता येईल, यावर विविध देशांतील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. सादर व स्वीकृत सर्व संशोधन निबंध टेलर अँड फ्रान्सिसच्या स्कोपस-सूचीबद्ध परिषद कार्यवृत्तात प्रकाशित होणार असून त्यामुळे संशोधकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक दृश्यमानता मिळणार आहे.

ही परिषद कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, सचिव व प्र-कुलगुरू डॉ. स्मिता जाधव आणि कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. परिषदेतील १२ देशांचा सहभाग, १३५ संशोधन निबंधांचे सादरीकरण आणि २६ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची उपस्थिती, ३५० हून अधिक संशोधन निबंध सादरकर्ते, संशोधक, उद्योगतज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यामुळे परिषद जागतिक स्तरावरील शैक्षणिक मेळावा ठरली.

परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी प्रास्ताविकातून तंत्रज्ञान, व्यवसाय आणि सार्वजनिक धोरण यांच्या संगमावर संवाद घडवून आणण्याची विद्यापीठाची भूमिका अधोरेखित केली. डॉ. स्मिता जाधव यांनी आयटीसीच्या ‘ई-चौपाल’ मॉडेलचा संदर्भ देत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतकऱ्यांचे सक्षमीकरण कसे साध्य होऊ शकते, यावर प्रकाश टाकला.

आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेट्री यांनी ३डी प्रिंटिंग व कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या तंत्रज्ञानामुळे भारत संशोधन व नवोन्मेष क्षेत्रात अग्रस्थान मिळवू शकतो, असे मत व्यक्त केले. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी जिल्हास्तरीय नवकल्पना केंद्रे व पेटंट व्यावसायिकीकरणाच्या माध्यमातून शाश्वत नवोन्मेष परिसंस्था उभारण्याचे महत्त्व स्पष्ट केले. टेंपल युनिव्हर्सिटी, रोम येथील प्रा. बर्नार्डो निकोलेटी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यवेधी, जनरेटिव्ह व एम्बेडेड क्षमतांवर मार्गदर्शन केले.

परिषदेत शाश्वत व्यवसाय मॉडेल्स, सर्क्युलर इकॉनॉमी, इंडस्ट्री ५.०, हरित तंत्रज्ञान, हवामान बदल प्रतिबंध, कृत्रिम बुद्धिमत्ता व बिग डेटा, शाश्वत धोरण व प्रशासन, उद्योजकता आणि नैतिक तंत्रज्ञान अशा विविध उपविषयांवर चर्चासत्रे घेण्यात आली. उद्योग व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहभागामुळे शैक्षणिक-औद्योगिक सहकार्याला चालना मिळाली.

परिषदेचे अध्यक्ष डॉ. सचिन वेर्णेकर (मानद प्राध्यापक व संशोधन प्रमुख ) आणि परिषदेचे संयोजक व जीबीएसआरसीचे संचालक डॉ. मनीष सिन्हा यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी सुसंगत संशोधन व बहुविध क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने या परिषदेचे महत्त्व अधोरेखित केले.

या यशस्वी आयोजनातून जीबीएसआरसीने शैक्षणिक उत्कृष्टता, जागतिक सहकार्य आणि शाश्वत विकासाभिमुख संशोधनाच्या दिशेने आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version