पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे दि. २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ दरम्यान राष्ट्रीय विज्ञान दिन २०२६ उत्साहात साजरा करण्यात येत आहे. भारताचे पहिले भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ सर सि.व्ही. रमण यांनी लावलेल्या ‘रमण परिणाम’ या शोधाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
या निमित्ताने लहान मुलांसाठी व सर्वसामान्य अभ्यागतांसाठी विविध परस्परसंवादी व सहभागात्मक विज्ञान उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव कल्पकघर (आयसर पुणे व टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड), लिडरशीप फॉर इक्विटी फाऊंडेशन तसेच रोबोटेक्स इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमांची ठळक वैशिष्ट्ये
उत्सवाची सुरुवात २७ फेब्रुवारी २०२६ रोजी स्टेम वेदर हॅकाथॉनच्या उद्घाटन सत्राने झाली. शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ व विद्यार्थ्यांसाठी दिवसभर मायक्रो वेदर स्टेशन प्रकल्पावर आधारित वेदर हॅकेथॉन आयोजित करण्यात आला.
आयसर पुणे येथील तज्ज्ञांनी घेतलेल्या विशेष स्टेम हॅकेथॉन व्याख्यानातून सहभागींस मार्गदर्शन पद्धती व हवामान विज्ञान संकल्पनांबाबत प्रेरणादायी माहिती देण्यात आली.
पिं.चिं.मनपा शाळांतील विद्यार्थ्यांनी सायन्स पार्कमध्ये आयोजित प्रत्यक्ष स्टेम उपक्रम व सर्जनशील विज्ञान कृतींमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचा मुख्य कार्यक्रम दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायन्स पार्कच्या खुल्या प्रांगणात संपन्न झाला.
या प्रसंगी प्रवीण तुपे, संस्थापक-संचालक, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क, यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. त्यांनी विद्यार्थी, पालक व सहभागी यांना दैनंदिन जीवनात सर्जनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन व नवोन्मेषी विचारसरणी जोपासण्याचे आवाहन केले. तसेच प्रयोगशीलतेद्वारे विज्ञान समजून घेऊन त्याचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
दिवसभरात अभ्यागतांनी खालील उपक्रमांचा आनंद घेतला:
• शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी सादर केलेले स्टेम मॉडेल व वेदर हॅकाथॉन प्रदर्शन
• आयसर पुणे येथील प्राध्यापकाचे स्टेम व्याख्यान
• स्टेम टिंकरिंग प्रत्यक्ष प्रात्यक्षिके
• ३ डी आर्ट, पेन प्लॉटर आर्ट व पझल झोन उपक्रम
• तारांगण सभागृहात स्टेम चित्रपट प्रदर्शन
• सीलॅब – डेटा-आधारित शालेय प्रयोगांची ओळख
• कलपकघर – कम्युनिटी टिंकरिंग सेंटर येथे परस्परसंवादी प्रात्यक्षिके
कार्यक्रमाची सांगता वेदर हॅकाथॉन व उत्कृष्ट स्टेम एकूण ५० मॉडेल सादरीकरणातील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभाने झाली.
इयत्ता ५ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स व कोडिंगवरील विनामूल्य १ तासांची विशेष सत्रे आयोजित करण्यात आली. भविष्याची कल्पना करा, महासागरांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, तुमचा पहिला विज्ञान बॉट तयार करा, रोबोट्ससोबत संवादात्मक मजा, मिशन मंगळ रोव्हर मिनी बॉट अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सायन्स पार्कतर्फे अभ्यागतांसाठी विनामूल्य लिक्विड नायट्रोजन शो, विज्ञान शो आणि मॅजिक शो आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमांना प्रचंड प्रतिसाद लाभला.
धुळे, ठाणे, अकोला, हडपसर, थेरगाव, मोशी, सांगवी, सांगली व परभणी येथील विविध शाळांनी सायन्स पार्कला भेट देऊन कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.
उत्सवाची सांगता दि. १ मार्च २०२६ रोजी पुढील कार्यक्रमांनी होणार आहे:
• कलपकघर व सायन्स पार्क खुल्या प्रांगणात स्टेम मॉडेल प्रदर्शन
• स्टेम आर्ट + ३ डी आर्ट + पेन प्लॉटर + पझल झोन (कम्युनिटी एंगेजमेंट उपक्रम)
• डॉ. अरविंद नातू (मानद अध्यक्ष, बोर्ड ऑफ गव्हर्नर्स, कोलकाता व संचालक, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क) यांचे स्टेम व्याख्यान
• विजेत्या सहभागींचा पारितोषिक वितरण समारंभ
तसेच विज्ञान व्याख्यानमालेअंतर्गत १३४ वे लोकप्रिय विज्ञान व्याख्यान मराठी विज्ञान परिषद यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणार असून त्यानंतर सांस्कृतिक संगीत संध्या होणार आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिन २०२६ निमित्त आयोजित कार्यक्रमांना विद्यार्थी, शिक्षक, विज्ञानप्रेमी व नागरिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून परिसरात वैज्ञानिक दृष्टिकोन व नवोन्मेषाची भावना अधिक दृढ होत आहे.
सायन्स पार्कतर्फे सर्व नागरिकांना समारोपाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून विज्ञान व तंत्रज्ञानाच्या या राष्ट्रीय उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
