पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सांस्कृतिक वार्तापत्र प्रकाशित ‘हिंदू जागरणाच्या १०० वर्षांची संघर्षयात्रा’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला. शंभर वर्षांच्या हिंदू समाजजागरणाच्या वाटचालीचा सविस्तर आढावा घेणारा हा ग्रंथ राष्ट्रीय अस्मिता आणि समाजपरिवर्तनाचा दस्तऐवज ठरत आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे जिल्हा कार्यवाह मा. श्री. नरेंद्रजी पेंडसे यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे प्रमुख उपस्थित होते. तसेच सांस्कृतिक वार्तापत्रचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत विक्री अधिकारी श्री. निखिल देविदास वझे यांचीही उपस्थिती लाभली.
ग्रंथामध्ये गेल्या शतकातील हिंदू समाजजागरणाची वाटचाल, विविध सामाजिक व राष्ट्रीय चळवळी, संघटनात्मक कार्य, विचारप्रवाह आणि संघर्षमय प्रवासाचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. समाजपरिवर्तन, सांस्कृतिक जतन आणि राष्ट्रीय अस्मिता यांचे ऐतिहासिक संदर्भांसह विवेचन या पुस्तकात करण्यात आले आहे.
मराठी भाषा दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देताना नरेंद्रजी पेंडसे यांनी मराठी साहित्यातील नवरसांची ओळख करून दिली. मराठी भाषा समृद्ध साहित्यपरंपरेची असून तिच्या माध्यमातून समाजमन घडते, असे त्यांनी सांगितले. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण रक्षण, स्वबोध आणि नागरी कर्तव्य या पाच विषयांवर समाजात प्रबोधन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले की, हा ग्रंथ केवळ इतिहासाचा आढावा नसून प्रेरणादायी प्रवास आहे. तरुण पिढीने आपल्या सांस्कृतिक परंपरेचा अभ्यास करून समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा घ्यावी, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास नगरसेविका अनिता काटे, सौ. कुंदा भिसे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना या अंकाचे वितरण करण्यात आले. सोहळा उत्साहपूर्ण आणि विचारप्रवर्तक वातावरणात संपन्न झाला.
