जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे‑पाटील यांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी‑चिंचवड महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या भागांना लवकरच स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. यासाठी आंद्रा धरण येथून अधिक प्रवाहाने पाणी सोडण्याचे तसेच इंद्रायणी नदी पात्रातील निघोजे बंधारा तातडीने स्वच्छ करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराला मावळ परिसरातील पवना धरण आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. आंद्रा धरणातून सोडण्यात येणारे पाणी निघोजे बंधाऱ्यामार्गे इंद्रायणी नदीतून उचलून चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून समाविष्ट भागातील नागरिकांना वितरित केले जाते.
मात्र मोशी, चिखली, चऱ्होली, चोविसावाडी, डुडुळगाव आणि बोऱ्हाडेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त व अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याची बाब आमदार महेश लांडगे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केली. दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त असल्याचे त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले.
यासंदर्भात आमदार लांडगे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संपूर्ण परिस्थिती मांडली. त्यानंतर मंत्र्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सूचना देत, आंद्रा धरणातून अधिक प्रवाहाने पाणी सोडण्याचे व निघोजे बंधारा त्वरित स्वच्छ करण्याचे आदेश दिले.
तसेच या विषयावर तालिका अध्यक्ष समाधान अवताडे यांनीही शासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
“आंद्रा धरणातून अधिक प्रवाहाने इंद्रायणी नदीत पाणी सोडले जाईल. निघोजे बंधारा जलसंपदा विभागाकडून तातडीने स्वच्छ करण्यात येईल. त्यामुळे समाविष्ट भागातील नागरिकांना स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा होईल. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य शासन आणि महापालिका कटिबद्ध आहेत. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे शहराच्या वतीने आभार मानतो.”
— महेश लांडगे,
भोसरी विधानसभा आमदार, भारतीय जनता पार्टी
