Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शहरातील थकीत मालमत्ताकर वसुलीस गती देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने १ मार्च २०२६ पासून विशेष ‘अभय योजना’ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या थकबाकीदारांना मनपा करावरील विलंब दंडात तब्बल ९० टक्के सवलत देण्यात येणार आहे. ही योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत मर्यादित कालावधीसाठी लागू राहणार आहे.

शहराच्या विकासासाठी मालमत्ताकर हा प्रमुख महसूल स्त्रोत असून रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा व शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधा नागरिकांच्या करातून उभ्या राहतात. आतापर्यंत सुमारे ५ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी प्रतिसाद देत ७४७ कोटी रुपयांचा मालमत्ताकर भरला आहे. मात्र, अद्याप सुमारे २ लाख १२ हजार ४४० मालमत्ताधारकांकडे थकबाकी प्रलंबित आहे.
वसुली मोहिमेला वेग देण्यासाठी महापालिकेच्या १८ विभागीय कार्यालयांमार्फत विशेष पथके कार्यरत असून थकबाकीदारांशी थेट संपर्क साधला जात आहे. तसेच विविध माध्यमांतून कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील थकबाकीसह संपूर्ण रक्कम १ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत एकरकमी भरणे आवश्यक आहे. मुदत संपल्यानंतर नियमित वसुली प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महापौर रवी लांडगे म्हणाले, “महापालिकेची ‘अभय योजना’ ही नागरिकांना दिलेला विश्वासाचा शब्द आहे. थकबाकीमुळे वाढलेला आर्थिक ताण कमी करण्यासाठी ९० टक्के विलंब दंडावर सवलत देण्यात येत आहे. ही मर्यादित कालावधीची संधी साधून ३१ मार्चपूर्वी थकीत मालमत्ता कर भरावा.”
महापालिका प्रशासनातील अधिकारी श्रावण हर्डीकर यांनीही नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “१ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत थकीत रक्कम एकरकमी भरल्यास ९० टक्के सवलत लागू होईल. सर्व प्रकारच्या मिळकतींसाठी योजना लागू असून थकबाकीदारांनी संबंधित विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून त्वरित भरणा करावा.”

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version