Spread the love

 

‘इमर्जिंग टीम ऑफ द इयर’ हा मानाचा पुरस्कार

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -स्पेस रोबोटिक्स सोसायटीच्या वतीने उडपी, कर्नाटक येथे “इंटरनॅशनल रोव्हर चॅलेंज २०२६” आणि “इंटरनॅशनल स्पेस ड्रोन चॅलेंज २०२६” या जागतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (पीसीसीओई) मधील टीम ऑटोमॅटॉन्सने चमकदार कामगिरी केली. त्यांना ‘इमर्जिंग टीम ऑफ द इयर’ हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.

अवकाशात अंतराळवीरांना सहाय्य करणाऱ्या मंगळ रोव्हरची संकल्पना मांडणे, त्याची रचना, विकास व संचालन करणे यासाठी प्रोत्साहन देणे, अनुकरणात्मक परिस्थितीत विशिष्ट मंगळ मोहिमा पूर्ण करणे, ग्रह रोव्हर्स डिझाईन करणे आणि चालवणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट होते.

या टीमने स्वदेशी विकसित केलेले कार्तिकेय २.० हे रोव्हर सादर केले. याचे डिझाईन, हालचाल क्षमता, कार्यक्षम संचालन यामध्ये वेगळेपण होते. स्पर्धेच्या अंतिम फेरीत पीसीसीओई सह भारतातील ३३ संघांची निवड करण्यात आली होती.
पीसीसीओईच्या संघात पियुष पाटील, अथर्व जुंघारे, वर्धन खिंवसरा, श्रेयश जगदाळे, चिन्मय पाटील, ओम जगताप, लक्ष्मीकांत ननावरे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विजेत्या संघाला बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, प्रा. डॉ. संजय माटेकर, विद्यार्थी विकास व कल्याण विभाग अधिष्ठाता डॉ. पद्माकर देशमुख, सहयोगी अधिष्ठाता प्रा. अमित पंचवाडकर यांनी मार्गदर्शन केले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्या संघाचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version