Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ‘तिजोरीची चावी’ मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपकडून अभिषेक बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांची निवड आता जवळपास निश्चित झाली आहे. स्थायी समितीत भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्ज दाखल न झाल्यामुळे बारणे यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी (२८ फेब्रुवारी) होणाऱ्या विशेष सभेत त्यांच्या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब होईल.

अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याच्या दिवशी पक्षांतर्गत चर्चेनंतर बारणे यांच्या नावावर अंतिम निर्णय घेण्यात आला. वाकडचे प्रतिनिधी संदीप कस्पटे आणि रहाटणीचे नगरसेवक बाबा त्रिभुवन हे देखील इच्छुक होते; मात्र पक्षश्रेष्ठींनी बारणे यांच्यावर विश्वास दाखवला. त्यानुसार बारणे यांनी नगरसचिव मुकेश कोळप यांच्याकडे अर्ज सादर केला. यावेळी उपमहापौर शैलजा बाबर आणि सभागृह नेते प्रशांत शितोळे उपस्थित होते.
स्थायी समिती अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया शनिवारी सकाळी ११ वाजता महापालिका मुख्यालयात पार पडणार आहे. यासाठी समिती सदस्यांची विशेष सभा बोलावण्यात आली असून, पीठासीन अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

समितीतील पक्षीय चित्र
१६ सदस्यीय स्थायी समितीत भाजपचे ११ सदस्य आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे चार आणि शिवसेनेचा (शिंदे गट) एक सदस्य आहे. या संख्याबळामुळे अध्यक्षपदावर भाजपचा उमेदवार विराजमान होणे निश्चित मानले जात आहे.

कोण आहेत अभिषेक बारणे?
थेरगाव परिसरातील अभिषेक बारणे हे व्यावसायिकदृष्ट्या सिव्हिल इंजिनिअर असून त्यांनी २०१० मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला. अवघ्या २१व्या वर्षी त्यांनी महापालिका निवडणूक लढवली होती. पहिल्याच प्रयत्नात अल्प मतांनी पराभव पत्करावा लागला; मात्र त्यांनी राजकीय क्षेत्रातील वाटचाल कायम ठेवली.

२०१७ मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्यानंतर स्थायी समिती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. थेरगाव रुग्णालय, बटरफ्लाय ब्रीज तसेच विविध अंतर्गत रस्ते व विकासकामांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. २०२६ च्या निवडणुकीत विजय मिळवत त्यांनी आपली राजकीय घोडदौड कायम ठेवली.

अनुभव, संघटन कौशल्य आणि पक्षातील विश्वास या जोरावर आता त्यांच्याकडे महापालिकेच्या महत्त्वाच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची धुरा सोपवली जाणार आहे. शनिवारी होणारी निवड प्रक्रिया ही केवळ औपचारिकता ठरणार असल्याचे चित्र आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version