पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाच्या आज (दि. २०) झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत भटक्या कुत्र्यांचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. शहरातील वाढत्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.
भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक राजू मिसाळ यांनी हा विषय ठळकपणे मांडला. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी प्रतीकात्मक कुत्र्याचे मॉडेल आयुक्त व महापौरांसमोर ठेवत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांकडून भटक्या कुत्र्यांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्याचे त्यांनी सांगितले. अलीकडेच शाळेच्या बसमधून उतरत असलेल्या मुलांवर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडल्याचा उल्लेख करत, “नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सभागृहात सादर करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या आठ महिन्यांत सुमारे २० हजारांहून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद आहे. गेल्या दहा वर्षांतील आकडेवारीतही सातत्याने वाढ दिसून येत असून, २०२४-२५ या वर्षात (ऑक्टोबरपर्यंत) तब्बल २८,०९९ घटनांची नोंद झाली आहे. २०१६-१७ मधील १०,५३३ घटनांच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय मानली जात आहे.
दरवर्षी वाढणारी ही संख्या प्रशासनासाठी धोक्याची घंटा असल्याचे मत अनेक नगरसेवकांनी व्यक्त केले. कुत्र्यांच्या निर्बंध, नसबंदी आणि नियंत्रणासाठी ठोस कृती आराखडा जाहीर करावा, तसेच तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी सभागृहात करण्यात आली.
या गंभीर प्रश्नावर प्रशासन कोणती ठोस पावले उचलते आणि शहरवासीयांना दिलासा कधी मिळतो, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
