Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत राजकीय चुरस उफाळून आली. विविध मुद्द्यांवर चर्चा रंगत असताना नगरसेवकांमध्ये टोलेबाजी, कोपरखळ्या आणि उपरोधिक टिप्पणींचा वर्षाव झाला. त्यामुळे सभागृहात काही काळ हास्यकल्लोळ उसळला. काही नगरसेवक महापौरांना औपचारिक अभिवादन न करताच ये-जा करत असल्याचेही चित्र दिसून आले.

माजी महापौर राहुल जाधव यांनी बोलताना भाजपला २०१७ आणि २०२६ मध्येही ‘घड्याळा’च्या मदतीची गरज भासली नसल्याचा उल्लेख केला. तसेच सभागृहात जास्त बोलणाऱ्यांचे राजकीय भविष्य धोक्यात येते, असा टोला लगावत काही नेत्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्याला विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिले. जाधव हे मूळचे भाजपचे नसून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मधून आले असल्याची आठवण करून देत, ताल-लय सांभाळून बोलावे असा सल्ला दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सभागृह नेते प्रशांत शितोळे यांच्याविषयीही चर्चा रंगली. विरोधी पक्षनेते भोईर यांनी शितोळेंना सभागृह नेतेपद देण्यामागील राजकीय गणितावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच पूर्वीच्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देत काही नेत्यांवर उपरोधिक टिप्पणी केली. या टोलेबाजीमुळे वातावरण काही काळ हलके-फुलके झाले.
दरम्यान, महापौर रवी लांडगे यांनी पदाची संधी दिल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच स्थानिक आमदारांचे आभार व्यक्त केले. यावर भोईर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार न दिल्यामुळेच बिनविरोध निवड झाली, याची आठवण करून देत महायुतीचा संदर्भ विसरू नये, असा टोला लगावला. त्यावर लांडगे यांनी “मी महायुतीचा नव्हे, तर शहराचा महापौर आहे,” असे स्पष्ट करत सभागृहात आपली भूमिका मांडली.

सभेत माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक नितीन काळजे यांनी प्रभागातील मोकाट श्वान आणि पाणीपुरवठ्यासह विविध स्थानिक प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी सभागृह नेत्यांनी चर्चा आवरती घ्यावी, अशी सूचना केली. “महापौरांनी सांगितल्यावर मी थांबेन,” असे उत्तर देत काळजे यांनी आपले मत नोंदवले आणि शेवटी चर्चेला विराम दिला.
एकूणच, पहिल्याच सभेत राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले असले तरी, शेवटी विषयांवर चर्चा करत सभा पार पडली. नव्या कार्यकाळाची सुरुवातच शब्दांच्या फटाक्यांनी झाल्याने पुढील सभांमध्येही अशीच चुरस कायम राहणार, हे स्पष्ट झाले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version