Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ‘तिजोरीच्या चाव्या’ म्हणून ओळख असलेल्या स्थायी समितीसह विविध विषय समित्यांच्या सदस्यांची निवड शुक्रवारी (ता. २०) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे. विशेषतः स्थायी समितीवर कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापौर, उपमहापौर आणि पक्षनेतेपदाच्या निवडीनंतर आता स्थायी समिती व विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक या विषय समित्यांवर कोणाला संधी मिळते, याबाबत उत्सुकता आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर तहकूब करण्यात आलेली सभा दुपारी एक वाजता होणार असून त्यात सदस्यांची निवड जाहीर केली जाणार आहे.
अशी होईल निवड प्रक्रिया
स्थायी व विषय समिती सदस्यांची निवड सर्वसाधारण सभेत केली जाते. सत्ताधारी भाजपची नावे पक्षनेते प्रशांत शितोळे, राष्ट्रवादी काँग्रेसची नावे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, तर शिवसेनेचे नाव गटनेते विश्वजित बारणे बंद पाकिटातून पीठासीन अधिकारी तथा महापौर रवी लांडगे यांच्याकडे देतील. त्यानंतर सदस्यांची नावे सभागृहात जाहीर केली जातील.

कोट्यानुसार जागावाटप
महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार स्थायी समितीत १६ सदस्य असतात. सभागृहातील संख्याबळानुसार भाजपला ११, राष्ट्रवादी काँग्रेसला ४ आणि शिवसेनेला १ जागा मिळणार आहे. या १६ सदस्यांमधून स्थायी समितीच्या अध्यक्षाची निवड केली जाणार असून भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने अध्यक्षपद भाजपकडेच जाण्याची शक्यता आहे.
भाजपमध्ये उत्सुकता
भाजपच्या कोअर कमिटीने संभाव्य सदस्यांची यादी प्रदेश समितीकडे पाठवली आहे. ज्येष्ठ, निष्ठावंत की निवडणुकीपूर्वी इतर पक्षांतून आलेल्यांना संधी मिळते, याबाबत पक्षांतर्गत चर्चेला उधाण आले आहे. महापौर, उपमहापौर आणि पक्षनेतेपदात समतोल साधल्यानंतर स्थायी व विषय समित्यांतही जुन्या-नव्यांचा समावेश केला जातो का, याची उत्सुकता आहे.

विषय समित्यांत शिवसेनेला स्थान नाही
विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा तसेच क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक या विषय समित्यांची सदस्यसंख्या प्रत्येकी ९ आहे. सभागृहातील १२८ सदस्यांच्या प्रमाणात भाजपला प्रत्येक विषय समितीत ६, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ३ सदस्य मिळणार आहेत. शिवसेनेचे संख्याबळ कमी असल्याने त्यांना विषय समित्यांमध्ये स्थान मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्थायी समिती ही महापालिकेच्या आर्थिक निर्णयांवर प्रभाव टाकणारी महत्त्वाची समिती असल्याने तिच्या अध्यक्षपदासह सदस्य निवडीकडे शहराचे लक्ष लागले आहे. सभागृहात अंतिम नावांची घोषणा झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version