Spread the love
शिवगर्जना, पालखी मिरवणूक, मर्दानी खेळाद्वारे विद्यार्थांचे शिवरायांना अभिवादन   

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सनई-चौघड्यांचे मंजुळ स्वर, तुतारीच्या गगनभेदी गर्जना, ढोल-ताशांचा निनाद, भगव्या पताका आणि मर्दानी खेळांसह ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय!’, ‘जय भवानी, जय शिवराय!’ आणि ‘नमो पार्वती पते, हर हर महादेव’ या घोषणांच्या जयघोषात एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ येथे महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे प्रतीक असलेला भगवा ध्वज फडकावून जयंती उत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र लोकसेवा आयोगचे माजी अध्यक्ष डॉ. किशोर राजे निंबाळकर, विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डाॅ.सायली गणकर, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, डॉ. नचिकेत ठाकूर, कुलसचिव डॉ. महेश चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

लोणी-काळभोर व कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीतील नागरिक, विद्यापीठाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि शेकडो विद्यार्थ्यांसमोर विद्यार्थ्यांनी शिवरायांवरील कविता, पोवाडे आणि पहाडी आवाजातील शिवगर्जना सादर केल्या. या सादरीकरणामुळे उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक नृत्य व मैदानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. शिवरायांच्या पालखीसह मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर अश्वारूढ पुतळ्याला क्रेनद्वारे पुष्पहार अर्पण करून महाराजांची आरती करण्यात आली आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी बोलताना प्रा. डॉ. कराड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे उर्जेचा प्रचंड मोठा स्रोत आहेत. आयुष्यात कितीही मोठ्या समस्या आणि संकटे आली, तरी शिवचरित्र वाचल्यास त्यावर मार्ग सापडतो. छत्रपती शिवाजी महाराज आपल्यातच आहेत आणि ते आज ३९६ वर्षांचे झाले असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे शिवछत्रपतींचे गुण आत्मसात करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करणे हीच खरी शिवजयंती आहे, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

 रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठात आयोजित रक्तदान शिबिर आणि गडकिल्ले बनविण्याच्या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. रक्तदान शिबिरात तब्बल १७० हून अधिक दात्यांनी रक्तदान केल्याने हे शिबिर अत्यंत यशस्वी ठरले. विद्यापीठाच्या नवीन आयटी इमारतीच्या प्रवेशद्वारावर या दोन्ही उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी रक्तदानासारखे सामाजिक उपक्रम राबवून शिवजयंती साजरी केल्याने परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version