Spread the love

 

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका ह आणि ड प्रभाग अंतर्गत पिंपळे गुरव व नवी सांगवी परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यावसायिक बांधकामे सुरू असल्याचा आरोप करत माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी आयुक्तांकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

दिलेल्या निवेदनात पिंपळे गुरव येथील मोरया पार्क, जाभूळकर पार्क ५ व ६ लेन परिसर तसेच नवी सांगवीतील प्रभाग क्रमांक ३१ मधील चैत्रबन सोसायटी परिसरात परवानगीशिवाय मजल्यांवर मजले चढवणे, निवासी इमारतींचे व्यावसायिक रूपांतर करणे आणि बेकायदेशीर गाळे उभारणे असे प्रकार सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या अनधिकृत बांधकामांना राजकीय वरदहस्त मिळत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यांच्या छुप्या पाठिंब्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर बांधकामे होणे शक्य नसल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे. विशेषतः निवडणूक काळात अशा बांधकामांना अधिक वेग आल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

“सामान्य नागरिकांच्या बांधकामांना आमचा विरोध नाही; मात्र व्यावसायिक स्वरूपाची अनधिकृत बांधकामे तात्काळ थांबवून ती भुईसपाट करावीत. संबंधित अधिकारी व दोषींवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी,” अशी ठाम भूमिका जगताप यांनी मांडली आहे.
दरम्यान, मनपा प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून नियमबाह्य बांधकामांवर जमीनदोस्त कारवाई न केल्यास राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देण्यात येईल तसेच प्रसंगी न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version