पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘सारथी’ (SARATHI – System for Assistance to Residents and Tourists through Helpline Information) पोर्टल व मोबाईल अॅप गेल्या दोन महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेतील विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक श्री. विनोद जयवंत नढे यांनी आयुक्तांकडे लेखी निवेदन देत तात्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे.
‘सारथी’ ही प्रणाली नागरिकांना महापालिकेच्या विविध विभागांशी संबंधित माहिती मिळविणे, तक्रारी नोंदविणे व त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी उपयुक्त माध्यम मानली जात होती. स्मार्ट सिटीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाणारी ही सेवा अचानकपणे बंद पडल्याने नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
निवेदनात नढे यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. ‘सारथी’ प्रणाली बंद असण्यामागील नेमके तांत्रिक अथवा प्रशासकीय कारण काय आहे, याची माहिती जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच या पोर्टलच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित विभागाकडे की बाह्य कंपनीकडे आहे, आणि त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे का, याबाबतही स्पष्टीकरण द्यावे, असे त्यांनी नमूद केले आहे.
नागरिकांच्या तक्रारी नोंदविण्याचे प्रमुख साधन बंद असल्याने त्यांच्या समस्या कोणाकडे मांडाव्यात, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनावरील विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त करत, ही सेवा तातडीने पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी नढे यांनी केली आहे.
याशिवाय, भविष्यात अशा प्रकारे महत्त्वाची यंत्रणा दीर्घकाळ बंद राहू नये यासाठी ठोस उपाययोजना आखाव्यात, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, ‘सारथी’ पोर्टल पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात मूलभूत डिजिटल सेवा अखंडित राहणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
