पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात कै. दिवंगत आमदार लक्ष्मण (भाऊ) पांडुरंग जगताप यांचे भव्य तैलचित्र सन्मानपूर्वक लावण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनी महापालिका आयुक्त व महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नढे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत आणि सर्वांगीण विकासात लक्ष्मणभाऊ जगताप यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. अभ्यासू लोकप्रतिनिधी, कुशल संघटक आणि ‘शहराचा डॅशिंग नेता’ म्हणून त्यांची ओळख होती. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, विधान परिषद सदस्य तसेच सलग तीन वेळा विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी विविध पदांवर कार्य करत शहराच्या विकासासाठी योगदान दिले.
शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न, रिंग रोडसारखी महत्त्वाची पायाभूत कामे आणि नागरी सुविधांच्या उभारणीत त्यांनी सर्वसामान्य नागरिकांचे हित केंद्रस्थानी ठेवले, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहातून शहराच्या दृष्टीने अनेक ऐतिहासिक व धोरणात्मक निर्णय घेतले जातात. त्यामुळे अशा सभागृहात लक्ष्मणभाऊ जगताप यांचे तैलचित्र लावणे हे त्यांच्या कार्याला अभिवादन ठरेल आणि भावी लोकप्रतिनिधींना प्रेरणा देईल, असा विश्वास नढे यांनी व्यक्त केला आहे.
या मागणीवर महापालिका प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
