पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उपमहापौर पदाच्या शुभेच्छा देताना अनेक नागरिक हार, पुष्पगुच्छ तसेच इतर भेटवस्तू आणून देत आहेत. त्याअनुषंगाने उपमहापौर शर्मिला बाबर यांनी आवाहन केले आहे की, उपमहापौर पदाच्या शुभेच्छा देताना हार, पुष्पगुच्छ तसेच इतर भेटवस्तू न देता त्याऐवजी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य म्हणून उपयोगी ठरेल असे साहित्य द्यावे. हे साहित्य ‘मस्ती की पाठशाळा’ या संस्थेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.
मस्ती की पाठशाळा हा उपक्रम बांधकामस्थळ (Construction Site) येथे काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी चालविला जात आहे. रावेत येथे असलेल्या या प्रकल्पांतर्गत सध्या ६० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शैक्षणिक साहित्य त्यांच्या शिक्षणासाठी व भविष्यासाठी अधिक उपयुक्त ठरेल. त्यामुळे उपमहापौर पदाच्या शुभेच्छा देण्याऐवजी विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असे स्कूल बॅग, रायटिंग पॅड, पाट्या, पेन, वह्या, वॉटर बॅग असे शैक्षणिक साहित्य देण्यात यावे, असे आवाहन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले आहे.
