टेडेक्स पीसीसीओइआर निगडी येथे संपन्न
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जीवनात आपली खरी लढाई बाह्य प्रतिस्पर्ध्यांशी नसून अंतर्मनाशी असते. या मनातील अडथळ्यांवर मात करून विचारपूर्वक निर्णय घेतल्यास प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार ठरू शकते असे प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू रणजीत बजाज यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) रावेत, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च च्या (पीसीसीओइआर) वतीने निगडी येथे “टेडेक्स पीसीसीओइआर २०२६” या कार्यक्रमात मार्गदर्शनातील मार्गदर्शन करताना बजाज बोलत होते.
यावेळी पीसीइटी अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डीन डॉ. शितलकुमार रवंदळे, पीसीसीओइआर चे संचालक, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी,
नामवंत वक्ते अखिल सचदेवा, क्रांती रेडकर, तरुण मिश्रा, प्राजक्ता देसाई, हिमांशू झालावाडिया, निरज मानेक, शाहीर चंद्रकांत माने, डॉ. विजय कोटकर, डॉ. किरण नाप्ते, समन्वयक डॉ. दिपाली ढाके, डॉ. मीनल बोडके आदी उपस्थित होते.
“अहम” म्हणजे आत्मजागृती उद्देश आणि वैयक्तिक जबाबदारी या थीमवर विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले.
यामध्ये अखिल सचदेवा यांनी सांगितले की, संगीताच्या विविध रचनांमधून माणसाच्या मनस्थितीवर सकारात्मक तसेच नकारात्मक परिणाम घडतात. जीवनात शांतता, आत्मविश्वास आणि गोंधळ असे टप्पे येतात हे परिवर्तनातील आवश्यक भाग आहेत. ‘अहम्’ म्हणजे चढ उतारांमुळे लयबद्ध झालेल्या जीवनात सूरांवर विश्वास ठेवून ऊर्जा मिळवणे.
क्रांती रेडकर यांनी सांगितले की, जीवन खूप सुंदर आहे परंतु ते समजून घेण्याआधी जगणे महत्त्वाचे आहे. बालपणीची जिज्ञासा कशी हळूहळू भीती व समाजमान्यतेत अडकते, तसेच गोंधळ आणि आत्मसंशय हे अपयश नसून वैयक्तिक वाढीचे टप्पे असतात. म्हणजेच ‘अहम्’ याचा अर्थ स्वतःच्या जीवनकथेची जबाबदारी स्वतः स्वीकारणे होय असे क्रांती रेडकर म्हणाल्या.
तरुण मिश्रा यांनी सांगितले की, शहरी भागातील लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे अनाथ आश्रम कमी होऊन प्रत्येक नागरिकाला त्यांच्या पायावर सक्षमपणे उभे राहण्यासाठी तयार केले पाहिजे.
प्राजक्ता देसाई यांनी सांगितले की, माझ्यामध्ये बालपणापासूनच देश सेवेचे आकर्षण होते. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करीत आहात, त्या क्षेत्रात शंभर टक्के योगदान देणे ही देश सेवा आहे ही प्रेरणा मला सचिन तेंडुलकर यांच्याकडून मिळाली. त्यामुळे मी ध्येयपूर्तीसाठी शंभर टक्के प्रयत्न केले.
शाहीर चंद्रकांत माने यांनी त्यांच्या शाहिरी पोवाड्यातून ‘अहम्’ चा अर्थ सांगितला. आयोजनात प्रणव नेभनानी, शशांक खेंगरे, सृष्टी भोईर आणि विद्यार्थी आयोजक संघाने सहभाग घेतला.
