चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणे तसेच आरोग्यासाठी सायकलिंगचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने ‘हिरकणी मावळे रायडर्स’ या सायकलपट्टूंच्या टीमने चिंचवड ते पुणे–तुळजापूर मार्गे अक्कलकोट असा सुमारे ४०० किलोमीटरचा दिवस-रात्र सायकल प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. या अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक मोहिमेत महिला व पुरुष अशा एकूण दहा सायकलपट्टूंनी सहभाग घेतला होता.
या सायकलपट्टूंनी दाखवलेल्या जिद्द, चिकाटी आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने स्वामी समर्थ मठ, चिंचवड येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या मोहिमेत प्रज्ञा अजगर, सोनाली कदम, अपर्णा अष्टीकर, ऋतुजा शेटे, हर्षल बोरकुले, मकरंद नरवडे, मुकुंद पाटे, प्रदीप साळी, स्वराज गावडे आणि दिनेश निकुंभ यांनी सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस फ्रेंड वेल्फेअर संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष तसेच स्वामी समर्थ मठाचे प्रमुख गजानन चिंचवडे उपस्थित होते. कार्यक्रमास वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे, उपाध्यक्ष रवींद्र काळे, सचिव जयंत कुलकर्णी, सहसचिव मंगला डोळे-सपकाळे, खजिनदार दिलीप चक्रे, ॲड. विलास कडेकर यांच्यासह सल्लागार रवींद्र सागडे, खुशाल दुसाने, धनंजय मांडके, उल्हास दाते, अर्जुन पाटोळे, अपर्णा कुलकर्णी, सरिता कुलकर्णी, बाळासाहेब जगताप, श्रीनिवास जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
पर्यावरण जनजागृती व आरोग्यासाठी सायकलिंगचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणाऱ्या या मोहिमेबद्दल वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या सन्मानाबद्दल सायकलपट्टूंनी आपल्या भावना व्यक्त करत फाउंडेशनचे आभार मानले. हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
