Spread the love

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  मकर संक्रांत सणानिमित्त यशस्वी महिला सामाजिक संस्थेच्या वतीने येरवडा येथे पुण्यातील एकल महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजात पती नसलेल्या महिलांना वेगळी वागणूक दिली जाते, हळदीकुंकूचा मान नाकारला जातो आणि सण-समारंभात त्यांना डावलले जाते—या मानसिकतेला बदल देण्यासाठी हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

हळदीकुंकू कार्यक्रमात एकल महिलांनाही सन्मानपूर्वक सहभागी करून घेऊन, त्यांनीही आनंदाने नटून-थटून सण साजरा करावा, त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, हा सकारात्मक बदल समाजात घडवण्यासाठी ‘तुम्ही पण करा’ असा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमास संस्थेच्या आधारस्तंभ वृंदादीदी भंडारी, समाजसेविका सविता शेलार, वनिता हजारे, रूपाली मॅडम वाघ, डॉ. पुनम घारे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी महिलांशी संवाद साधत समता, सन्मान आणि सामाजिक स्वीकार यावर भर दिला.
कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी महिला सामाजिक संस्थेच्या संस्थापिका सारिका अतुल मोरे यांनी केले होते. या उपक्रमासाठी पुणे शहरातील विविध भागांतून मोठ्या संख्येने एकल महिलांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, समाजातील रूढी-परंपरांना सकारात्मक बदलाची दिशा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version