Spread the love

 


लोणी-काळभोर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथील मॅनेट इमारतीच्या प्रांगणात ७७वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विशिष्ट सेवा मेडल (VSM) प्राप्त लेफ्टनंट जनरल व माजी महासंचालक, ऑर्डनन्स सेवा (DGOS) आर. के. कुशवाह (निवृत्त) यांच्या हस्ते ध्वजरोहण सोहळ्याने झाली.

यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य व देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र.कुलपती प्रा.डाॅ.मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मोहित दुबे, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. नचिकेत ठाकूर, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, मॅनेटचे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुराज भोयार आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना लेफ्टनंट जनरल कुशवाह म्हणाले, भारत हा खऱ्या अर्थाने विविधतेत एकता असणारा देश आहे. ही विविधता भाषा, धर्म, संस्कृती, वयोमान अशा सर्व पैलूंमध्ये नांदताना दिसते. हीच विविधता मला आज एमआयटी एडीटी विद्यापीठात अनुभवायला मिळाली. विद्यार्थ्यांनो, कायम लक्षात ठेवा की आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. यश व अपयश या नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे अपयशाने खचून न जाता सातत्यपूर्ण प्रयत्न करणाऱ्याला यश नक्कीच मिळते, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी बोलताना प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, आजचा दिवस भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची आठवण करून देणारा व त्यांना नमन करण्याचा आहे. गतवर्ष भारतीय लोकशाहीसाठी उल्लेखनीय ठरले असून अनेक आघाड्यांवर भारताने लक्षणीय प्रगती केली आहे. त्यामुळे भारतीयांनी स्वातंत्र्यानंतर मिळालेल्या अधिकारांचा सदुपयोग करावा व विकसित भारताच्या वाटचालीत हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार महाराष्ट्र नौदल शिक्षण आणि प्रशिक्षण अकादमी (मॅनेट) च्या कॅडेट्सनी केले. यावेळी एमआयटी सीबीएसई स्कूल व विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतांवर नृत्याविष्कार सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version