Spread the love

कुसगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे–मुंबई राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करून अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या ‘देवदूत’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामगारांच्या न्याय्य मागण्यांकडे आयर्न (आर्यन) पंप कंपनी प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ कुसगाव येथे भारतीय मजदूर संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.

अत्यंत धोकादायक आणि जबाबदारीचे काम करूनही या कामगारांना योग्य वेतन, सामाजिक सुरक्षा, विमा संरक्षण, सुरक्षितता साधने, निश्चित कामाचे तास तसेच कायदेशीर हक्क मिळत नसल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या अन्यायकारक परिस्थितीविरोधात भारतीय मजदूर संघाने रस्त्यावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधले.
या आंदोलनाचे नेतृत्व श्री. बाळासाहेब भुजबळ (संघटन सचिव, भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश), सचिन मेंगाळे (उपाध्यक्ष, भारतीय मजदूर संघ – महाराष्ट्र व अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ), सागर पवार (सचिव, पुणे जिल्हा)
यांनी केले.

यावेळी उपस्थित नेत्यांनी स्पष्ट इशारा दिला की, देवदूत कामगारांच्या प्रश्नांवर तात्काळ ठोस निर्णय न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवून ही लढाई राज्यस्तरावर नेण्यात येईल.
आंदोलनानंतर झालेल्या त्रिपक्षीय बैठकीत कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. यामध्ये देवदूत कामगारांना सन्मानजनक वेतनवाढीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच,
कामगारांच्या पत्नी व मुलांना सध्या कार्यरत ३ लाख रुपयांच्या मेडिक्लेम योजनेत समाविष्ट करण्यात येणार,सर्व कामगारांना २० लाख रुपयांचा अपघाती मृत्यू विमा लाभ, मागील कालावधीतील प्रलंबित ओव्हरटाईम वेतन लवकरच अदा करण्यात येणार
असा लेखी स्वरूपातील समझोता करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर आंदोलन शनिवार, ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थगित करण्यात आले आहे. मात्र, दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यास सोमवार, २ फेब्रुवारी २०२६ पासून बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय मजदूर संघाचे नेते बाळासाहेब भुजबळ, सचिन मेंगाळे आणि सागर पवार यांनी दिला आहे.
या बैठकीस कंपनीकडून  द्विवेश दिवाकर (एचआर हेड),  निलेश कुडेकर (मॅनेजर) उपस्थित होते. तर भारतीय मजदूर संघाकडून बाळासाहेब पाटील (कार्याध्यक्ष), उमेश विश्वाद (संघटन सचिव) यांच्यासह तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक, तसेच देवदूत कामगार व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version