Spread the love

 

निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – खान्देश मराठा मंडळाच्या वतीने सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ या प्रजासत्ताक दिनी वार्षिक स्नेह मेळावा आणि भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता निगडी प्राधिकरण येथील खान्देश मराठा मंडळ याठिकाणी पार पडणार असून, खान्देशच्या मातीतील विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवणाऱ्या मान्यवरांचा यावेळी विशेष सन्मान केला जाणार आहे.

या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे अध्यक्ष डॉ. शितलकुमार रवंदळे उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष मा. अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे आणि आमदार उमा खापरे यांसह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील दिग्गज या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत.

यावर्षीचा मानाचा ‘खान्देश रत्न’ पुरस्कार दिव्यांग स्त्री सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कुमारी मीनाक्षी राजाराम निकम यांना प्रदान करण्यात येणार आहे. सोबतच ‘खान्देश भूषण’ पुरस्काराने गुणवंत चिंधा सोनवणे (जलसंधारण), सौ. तेजस्विनी पवार (महिला व बालविकास) आणि डॉ. नंदकुमार बेडसे (अध्यक्ष, राज्य परीक्षा परिषद, पुणे) यांना गौरविण्यात येईल. कृषी क्षेत्रातील कार्यासाठी वसंतराव साळुंखे, क्रीडा क्षेत्रासाठी शेखर पाटील आणि सैनिकांच्या प्रशिक्षणासाठी डॉ. योगेश देसले यांना ‘खान्देश गौरव’ पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच प्रकाश पाटील (सायकलपटू), सौ. भारती सावंत (आदर्श माता) आणि मिथुन पाटील (पर्यावरण) यांना ‘खान्देश सन्मान’ पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

खान्देशातील मराठा समाजातील बांधवांचे संघटन मजबूत करणे आणि त्यांच्या यशोगाथा समाजासमोर आणणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या निमित्ताने मंडळ डिजिटल नोंदणी प्रक्रियेचाही शुभारंभ करणार असून, महिलांसाठी हळद-कुंकू कार्यक्रम होणार आहे, तरी सर्व समाज बांधवांनी या स्नेह मेळाव्यास सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष राजेंद्र देसले, किशोर पाटील, रमाकांत पाटील तसेच मंडळाचे अध्यक्ष ऍड. हेमंत चव्हाण, यांसह संचालक आणि मार्गदर्शक समितीने केले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version