Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील चार वर्षांची प्रशासकीय राजवट अखेर संपुष्टात येत असून, पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या हाती कारभार जाणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महापौरपदाची निवड होण्याची शक्यता असून, त्या पार्श्वभूमीवर गेली चार वर्षे बंद असलेली पदाधिकाऱ्यांची दालने उघडण्यात आली आहेत. महापालिका प्रशासनाने दालने व महासभा सभागृहाची स्वच्छता, दुरुस्ती आणि सज्जतेची कामे वेगाने सुरू केली आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने १२८ पैकी ८४ जागा जिंकत सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आपली पकड मजबूत केली आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौर, सत्तारूढ पक्षनेता, स्थायी समिती सभापती तसेच शिक्षण, विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा विषय समित्यांच्या सभापतीपदावर भाजपच्या नगरसेवकांची नियुक्ती होणार आहे. तर विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे जाणार आहे.

प्रशासकीय राजवटीदरम्यान महापालिका भवनाच्या तिसऱ्या मजल्यावरील अनेक पदाधिकाऱ्यांची दालने अधिकाऱ्यांच्या वापरासाठी देण्यात आली होती. सत्तारूढ पक्षनेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर तसेच विविध समित्यांची दालने प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली होती. आता लोकप्रतिनिधींची निवड पूर्ण झाल्याने ही दालने रिकामी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. आगामी काळात नव्या पदाधिकाऱ्यांच्या कामकाजासाठी ही दालने सज्ज केली जाणार आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version