Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत यंदा अनेक प्रभागांतील निकाल अत्यंत चुरशीचे ठरले. काही प्रभागांमध्ये विजयी उमेदवार थोडक्या मतांनी निवडून आले, तर अनेक ठिकाणी शिंदेसेना, मनसे, अपक्ष उमेदवार तसेच ‘नोटा’ला मिळालेली मते ही विजयी आणि पराभूत उमेदवारांतील मतफरकापेक्षा जास्त असल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे या निवडणुकीत तिसऱ्या आघाड्यांचा आणि मतविभाजनाचा मोठा प्रभाव दिसून आला.

प्रभाग क्रमांक ८ मधून भाजपचे सुहास कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या सीमा सावळे यांचा अवघ्या २५६ मतांनी पराभव केला. मात्र, येथे शिंदेसेनेचे महेंद्र सरवदे यांना १,५९८ मते मिळाल्याने लढत अधिक चुरशीची ठरली. प्रभाग ३२ मध्ये भाजपचे प्रशांत शितोळे यांनी राष्ट्रवादीचे अतुल शितोळे यांचा २९० मतांनी पराभव केला. या प्रभागात मनसेचे राजू सावळे यांना १,०२५ मते मिळाल्याने निकालावर अप्रत्यक्ष परिणाम झाल्याचे राजकीय विश्लेषण केले जात आहे.
प्रभाग २३ मध्ये राष्ट्रवादीच्या योगिता बारणे यांनी ४३९ मतांनी, तर प्रभाग ३० मध्ये प्रतीक्षा जवळकर यांनी ५०० मतांनी निसटता विजय मिळवला. या दोन्ही प्रभागांत शिंदेसेनेच्या उमेदवारांनी हजारांच्या आसपास मते घेतल्याने लढतीचे गणित बदलल्याचे दिसून आले. प्रभाग ३१ मध्ये भाजपचे ज्ञानेश्वर जगताप यांनी राष्ट्रवादीचे राजेंद्र जगताप यांचा ५२३ मतांनी पराभव केला. येथे अपक्ष उमेदवार सागर परदेशी यांना तब्बल ६,१२६ मते मिळाल्याने तिसऱ्या उमेदवाराची ताकद अधोरेखित झाली.

प्रभाग २७ मध्ये सागर कोकणे यांनी भाजपचे चंद्रकांत नखाते यांचा ६०० मतांनी पराभव केला, तर प्रभाग १३ मध्ये भाजपचे उत्तम केंदळे यांनी मनसेच्या सचिन चिखले यांना ६०७ मतांनी पराभूत केले. या दोन्ही ठिकाणी मतफरक कमी असल्याने निवडणूक शेवटच्या फेरीपर्यंत अटीतटीची ठरली.
‘नोटा’चा प्रभावही अनेक प्रभागांत ठळकपणे जाणवला. भीमाबाई फुगे (७३४) आणि दीप्ती कांबळे (७४५) यांच्या प्रभागांत ‘नोटा’ला मिळालेली मते ही त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या मताधिक्यापेक्षा अधिक होती. प्रभाग ८ मधून तुषार सहाणे यांनी भाजपचे माजी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांचा ७९० मतांनी पराभव करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली.

प्रभाग क्रमांक १९ मध्ये तर लढती अत्यंत रंगतदार ठरल्या. राष्ट्रवादीच्या सविता आसवानी यांनी भाजपच्या जयश्री गावडे यांचा अवघ्या २१ मतांनी पराभव केला. मात्र, याच लढतीत अपक्ष कविता शैलेंद्र मोरे यांना ३,२४२, तर पिंपरी-चिंचवड परिवर्तन आघाडीच्या अनिता भंडारे यांना २,६४८ मते मिळाली. दुसऱ्या जागेवर भाजपचे मंदार देशपांडे यांनी ३१५ मताधिक्याने विजय मिळवला, तर राष्ट्रवादीचे काळुराम पवार पराभूत झाले. येथे परिवर्तन आघाडीचे जीतू पहलानी यांना ५,४४६ मते मिळाली. विशेष म्हणजे, या प्रभागात राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांना जवळपास समसमान मते मिळाल्याने संघटनात्मक ताकद दिसून आली.

दुसरीकडे, काही प्रभागांमध्ये मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत नेत्यांनी आपली ताकद सिद्ध केली. भाजपचे नितीन काळजे यांनी तब्बल १९,६५३ मतांचे विक्रमी मताधिक्य मिळवत शहरातील सर्वांत मोठा विजय नोंदवला. त्यांच्यानंतर राष्ट्रवादीचे संदीप वाघेरे (१६,४३०), भाजपचे सचिन तापकीर (१६,२२९), सारिका गायकवाड (१६,०११), राहुल कलाटे (१४,८९६), स्नेहा कलाटे (१४,३४९), रेश्मा भुजबळ (१४,२५७), श्रुती डोळस (१३,५७४), हिराबाई घुले (१२,९९२), अर्चना सस्ते (१२,९१९), शैलजा मोरे (१२,८६६), विनायक गायकवाड (१२,७८४) आणि कुणाल वाव्हळकर (१२,७०७) यांनी पाच आकडी मताधिक्याने विजय मिळवला. राष्ट्रवादीचे डब्बू आसवानी यांनीही १२,१३९ मतांनी विजय मिळवत पक्षासाठी महत्त्वाची जागा राखली.
एकूणच, या निवडणुकीत निसटते विजय, तिसऱ्या आघाड्यांची वाढती ताकद आणि ‘नोटा’चा प्रभाव यामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मतदारांचा बदलता कल आणि आगामी राजकीय समीकरणांचे संकेत स्पष्टपणे समोर आले आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version